सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे हटविणार; दहा दिवसांत यादी करा, आयुक्त सत्यम गांधी यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:54 IST2025-04-17T13:53:46+5:302025-04-17T13:54:03+5:30
शिक्षणात राजकीय दबाव चालू देणार नाही

सांगली महापालिका क्षेत्रातील सर्व अतिक्रमणे हटविणार; दहा दिवसांत यादी करा, आयुक्त सत्यम गांधी यांचे आदेश
सांगली : कोणत्याही परिस्थितीत महापालिका क्षेत्रात अतिक्रमणे खपवून घेणार नाही. येत्या दहा दिवसांत अशा अतिक्रमणांची यादी तयार करण्याचे आदेश दिले आहेत. यादी प्राप्त होताच युद्धपातळीवर अतिक्रमणे हटविली जातील, असा इशारा सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त सत्यम गांधी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, महापालिका क्षेत्राला अतिक्रमणमूक्त केले जाईल. नाले, ओतात जी अतिक्रमणे असतील त्यांचीही माहिती घेऊ. महापुराला अशा अतिक्रमणांमुळे निमंत्रण मिळत असेल तर त्यावरही तातडीने कारवाई केली जाईल. नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणत्याही नागरिकाची तक्रार बेदखल होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल.
एकाच व्यक्तीला एका समस्येसाठी पुन्हा महापालिकेत यावे लागणार नाही. त्यासाठी आवश्यक ती यंत्रणा उभी केली जाईल. नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते दिले जातील. सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे लागेल. त्यासाठी करसंकलनात मोठी सुधारणा अपेक्षित आहे. घरपट्टी, पाणीपट्टीची वसुली सध्या समाधानकारक नाही. त्यावर आम्ही काम करू.
ड्रेनेज योजनेची माहिती घेणार
गांधी म्हणाले, महापालिका क्षेत्रातील ड्रेनेज योजना कोणत्या कारणास्तव रेंगाळली आहे, याची माहिती घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत महापालिकेच्या योजना निर्धारित वेळेत पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा आहे.
शिक्षणात राजकीय दबाव चालू देणार नाही
महापालिका शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. वर्षभरात निश्चित चांगले बदल दिसून येतील. शिक्षणाच्या बाबतीत कोणी राजकारण आणत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा गांधी यांनी दिला.
शहरातील हिरवाई वाढविणार
गांधी म्हणाले, सध्या महापालिका क्षेत्रातील हिरवाई (ग्रीन कव्हर) ७ टक्के आहे. तो वाढविण्यासाठी आम्ही कार्यक्रम हाती घेणार आहोत. त्याचबरोबर महापालिकेच्या उद्यानांमध्ये जादा सुविधा देऊन त्यांचा विकास केला जाईल.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत काम करणार
महापालिका क्षेत्राला महापुराचा नेहमीच त्रास होतो. त्यामुळे जागतिक बँकेच्या सहकार्याने आपत्ती व्यवस्थापन प्रकल्प शासनाकडे सादर केला आहे. त्याचा पाठपुरावा करून एक चांगले काम यामध्ये उभे करू, असे गांधी म्हणाले.