सांगलीतील अजित पाटील यांच्या कुटुंबीयांकडून वनविभागाला दोन एकर जमीन बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 13:07 IST2024-12-03T13:06:55+5:302024-12-03T13:07:35+5:30
वनविभागाकडून या जागेवर निसर्ग पर्यटन संकुल उभारणार

सांगलीतील अजित पाटील यांच्या कुटुंबीयांकडून वनविभागाला दोन एकर जमीन बक्षीस
सांगली : वन्यजीव संवर्धनासाठी आयुष्य वाहून घेतलेले सांगलीतील दिवंगत मानद वन्यजीव रक्षक अजित उर्फ पापा पाटील यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या स्मृती अमर ठेवल्या जाणार आहेत. त्यांच्या इच्छेनुसार पाटील कुटुंबीयांनी स्व:मालकीची दोन एकर जमीन वनविभागाच्या नावे केली आहे. या जागेवर आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत निसर्ग पर्यटन संकुल उभारण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे.
अजित पाटील यांनी राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य म्हणूनही काम केले होते. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उभारणीत व विकासात मोलाचे योगदान दिले. प्रकल्पाच्या निसर्ग पर्यटन विकासात योगदान देण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या पत्नी सुरेखा पाटील, कन्या रत्नप्रभा व गौरी यांच्यासह कुटुंबीयांनी त्यांच्या मालकीची पानेरी (ता. पाटण, जि. सातारा) येथील दोन एकर जमीन बक्षीसपत्राद्वारे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठानच्या नावे केली. ढेबेवाडी (जि. सातारा) येथील वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी बक्षीसपत्र स्वीकारले.
या सहकार्याबद्दल अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन, तसेच व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एम. रामानुजन यांनी आभार मानले. उपसंचालकांनी पाटील कुटुंबीयांचा सत्कार केला. या कामी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व नाना खामकर यांनी सहकार्य केले.
पाच दशके वनसंवर्धनासाठी कार्यरत..
पापा पाटील यांनी पाच दशके वनसंवर्धनासाठी काम केले. शिराळा येथे नागपंचमीला जिवंत नागांच्या पूजेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. जिवंत सापांचे प्रदर्शन थांबविले होते. चांदोली भागातील बेकायदेशीर बॉक्साइट खाणकामाविरोधातही याचिका दाखल केली होती. सह्याद्री खोऱ्यातील नरक्या, सप्तरंगी यांसारख्या वनस्पतींची अवैध तोड व चोरटी वाहतूक उघडकीस आणण्यात मोठा वाटा होता.