Sangli News: अहिल्यादेवींकडून भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:00 IST2025-12-16T18:59:22+5:302025-12-16T19:00:28+5:30
सांगलीत अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण, राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर

Sangli News: अहिल्यादेवींकडून भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन : देवेंद्र फडणवीस
सांगली : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. मुघल आक्रमणानंतर उद्ध्वस्त झालेली मंदिरे, तीर्थक्षेत्रे नव्याने उभी केली. शौर्य, धर्मप्रियता, प्रशासन, समता आणि न्यायाचे राज्य निर्माण केले. चंद्र-सूर्य असेपर्यंत अहिल्यादेवींचे नाव घेतच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सांगलीतील संजयनगर परिसरात महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मध्ययुगात छत्रपती शिवाजी महाराज, लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार आदर्श होता. लोकशाही, समता व न्यायाची मूल्ये त्यांच्या प्रशासनात दिसतात. त्यांनी २८ वर्षे शौर्याने, न्यायप्रियतेने राज्यकारभार केला. मुघलांनी आक्रमण करून अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. रामंदिर, काशी विश्वेश्वरासह अनेक पुण्यस्थळांचे जीर्णोद्धार करण्याचे काम अहिल्यादेवी यांनी केले.
जगन्नाथ पुरी मंदिराच्या विकासातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी राज्याची तिजोरी न वापरता स्वत:च्या वैयक्तिक संपत्तीतून काम केले. राज्याचा पैसा जनतेच्या कल्याणासाठी वापरला. अहिल्यादेवींनी विधवा महिलांना संपत्ती, शिक्षणाचा अधिकार दिला. त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले. माहेश्वर येथे साडी विणकाम उद्योग उभारून रोजगारनिर्मिती केली. आज तेथील साड्या भारताबाहेरही निर्यात होत आहेत.
माळवा प्रांतात त्यांनी सतरा प्रकारचे कारखाने उभारले. दरोडेखोर, लुटारूंविरोधात आदिवासींना एकत्र करून सेैन्य उभे केले. महिला सैन्याची तुकडी निर्माण केली. ग्रामस्तरावर न्यायालये उभारून गोरगरिबांना न्याय दिला. त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने लोकमाता ठरल्या.
चौंडीला प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले जाणार
फडणवीस म्हणाले की, अहिल्यादेवींची जन्मभूमी या चौंडीचा विकास आराखडा तयार केला आहे. चौंडीला राष्ट्रीय पातळीवरील प्रेरणास्थळ म्हणून विकसित केले जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखविलेला मार्ग, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेला संविधानाच्या मार्गानेच चालत राहू, अशा प्रकारचा संकल्प करतो.
राजकीय विरोधक एकाच व्यासपीठावर
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळा लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, गोपीचंद पडळकर यांच्यासह जिल्ह्यातील राजकीय विरोधक बऱ्याच दिवसांनंतर एका व्यासपीठावर आले होते. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार इद्रीस नायकवडी व पद्माकर जगदाळे यांची भेट चर्चेचा विषय ठरली.