Local Body Election: मतदारांच्या बोटावर शाई नव्हे, उमटणार मार्करची खूण, निवडणूक आयोगाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:15 IST2025-11-26T16:11:50+5:302025-11-26T16:15:37+5:30
सांगलीत ५८२ पेनची तयारी

Local Body Election: मतदारांच्या बोटावर शाई नव्हे, उमटणार मार्करची खूण, निवडणूक आयोगाचा निर्णय
सांगली : निवडणुकीत मतदान केल्यानंतर, मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते, दुबार मतदार होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. शाई लावण्याऐवजी मार्कर पेनने खूण करण्यात येणार आहे. मतदारांची संख्या आणि गरज लक्षात घेऊन सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने एकूण ५८२ मार्कर पेन उपलब्ध करून दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उरुण-ईश्वरपूर, आष्टा, पलूस, तासगाव, विटा, जत नगरपरिषद आणि शिराळा, आटपाडी नगरपंचायतीसाठी दि. २ डिसेंबरला मतदान होत आहे. या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान यंत्रासह अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती केली आहे. सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या कार्यक्षेत्रात २ डिसेंबरला मतदान होणार असून त्यासाठी २९१ मतदान केंद्रे केली आहेत. या प्रत्येक मतदान केंद्रावर दोन मार्कर पेन उपलब्ध करून देण्यात येतील, ज्याद्वारे मतदान कर्मचारी मतदाराच्या बोटावर चिन्हांकित करतील.
२,५७,९७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीच्या क्षेत्रातील १८९ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, ज्यामध्ये अध्यक्षपदाचाही समावेश आहे. या निवडणुकीत दोन लाख ५७ हजार ९७७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेसाठी ६४ हजार २१५, विटा ४६ हजार ३३२, आष्टा ३० हजार ५७३, तासगाव ३२ हजार ९९४, जत २८ हजार ९०, पलूस २२ हजार ६७, शिराळा नगरपंचायतीसाठी १३ हजार ९५, आटपाडी २० हजार ६११ मतदारांचा समावेश आहे. हे मतदार शहराचा भावी नगराध्यक्ष आणि नगसेवक निवडणार आहेत.
अशी आहेत मतदान केंद्रे
पालिका / मतदान केंद्र संख्या
उरुण-ईश्वरपूर / ६७
विटा / ४९
आष्टा / ३७
तासगाव / ३६
जत / ३४
पलूस / २६
शिराळा / १७
आटपाडी / २५
एकूण / २९१
निवडणुकीत मतदान केल्यानंतर, मतदाराच्या बोटावर शाई लावली जाते, दुबार मतदार होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जाते. पण, सहा नगरपरिषद आणि दोन नगरपंचायतीच्या निवडणुकीत शाईऐवजी मार्कर पेनने खूण करण्यात येणार आहे. - डॉ.पवन म्हेत्रे, प्रभारी सहायक आयुक्त, नगरपरिषद प्रशासन शाखा.