विधानसभा निवडणुकीनंतर सांगली जिल्ह्यात २८६५४ मतदार वाढले; पुरुष की महिला, सर्वाधिक संख्या कोणाची.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 17:52 IST2025-07-11T17:51:47+5:302025-07-11T17:52:21+5:30
ऑनलाईन नोंदणीमुळे मतदार संख्या वाढली

संग्रहित छाया
सांगली : विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात मागील चार महिन्यांत तब्बल २८ हजार ६५४ मतदारांची वाढ झाली आहे. यात सर्वाधिक महिला मतदार १७ हजार १०३ वाढले आहेत. विधानसभेवेळी जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार होते. यामध्ये २८ हजार ६५४ मतदारांची वाढ होऊन जुलै २०२५ पर्यंत २५ लाख ६४ हजार ७१९ मतदार नोंदणी झाली आहे. मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत.
गतवर्षी जिल्ह्यात झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. त्यामुळे १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या लक्षणीय वाढली. तसेच २० ते २९, २९ ते ४० या वयोगटातील मतदारही वाढले. विधानसभा निवडणुकीवेळी जिल्ह्यात २५ लाख ३६ हजार ६५ मतदार होते. यामध्ये २८ हजार ६५४ मतदार वाढले आहेत. यामध्ये पुरुष मतदार ११ हजार ५५४ आणि महिला मतदार १७ हजार १०३ वाढले आहेत. या नवीन मतदारांना आगामी जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
जिल्ह्यात गेल्या दहा महिन्यांत वाढलेले मतदार
विधानसभा मतदारसंघ - नोव्हेंबर २०२४ / जुलै २०२५
मिरज - ३४३८७६ / ३४९३१७
सांगली - ३५६४१० / ३६१७५२
इस्लामपूर - २८०८५६ / २८३०६२
शिराळा - ३०७०१२ / ३०९४७३
पलूस-कडेगाव - २९२८६६ / २९४२६७
खानापूर - ३५०९९६ / ३५५२६२
तासगाव-कवठेमहांकाळ - ३१२६८६ / ३१५८६८
जत - २९१३६३ / २९५७१८
एकूण - २५३६०६५ / २५६४७१९
युवा मतदारांची वाढ
विधानसभेला १५० तृतीयपंथी मतदार होते. गेल्या आठ महिन्यांत तीन तृतीयपंथी मतदार कमी होऊन सध्या १४७ संख्या झाली आहे. तसेच वाढलेल्या मतदानात बहुतांशी युवा मतदारांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना झालेली ही वाढ पुन्हा चर्चेचा विषय झाली आहे.
मतदार नोंदणी ही निरंतन चालणारी प्रक्रिया असल्याने निवडणूक विभागाकडून नवमतदारांची नोंदणी, स्थलांतरित, मयत मतदारांनी नावे यादीतून काढून टाकणे ही नियमित कामे केली जात आहेत. मतदार नोंदणी अखंडित चालूच आहे. यामुळेच मतदार संख्या वाढल्याचे दिसत आहे. - नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक), सांगली