निकालानंतर जल्लोष करताना मोटारीने धडक, बिसूरचा तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 17:12 IST2017-10-18T17:04:53+5:302017-10-18T17:12:48+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष साजरा करीत जात असताना भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने बिसूर (ता. मिरज) येथील उदय गणपती साळुंखे (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र संदीप ऊर्फ बट्या पाटील (३०) हा गंभीर जखमी झाला आहे.

निकालानंतर जल्लोष करताना मोटारीने धडक, बिसूरचा तरुण ठार
सांगली , दि. १८ : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष साजरा करीत जात असताना भरधाव मोटारीने जोराची धडक दिल्याने बिसूर (ता. मिरज) येथील उदय गणपती साळुंखे (वय ३२) हा तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र संदीप ऊर्फ बट्या पाटील (३०) हा गंभीर जखमी झाला आहे.
माधवनगर रस्त्यावर पश्चिम महाराष्ट्र पत्रा डेपोसमोर मंगळवारी सायंकाळी हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बिसूर येथे मंगळवारी दुपारी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाला लागला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला होता. दुचाकीवरून तरूण गुलाल उधळीत गावातून फेरफटका मारत होते.
उदय साळुंखे व संदीप पाटील हेही दुचाकीवरुन माधवनगरहून बिसूरच्या दिशेने जल्लोष करीत निघाले होते. माधवनगर पत्रा डेपोजवळ गेल्यानंतर त्यांना भरधाव मोटारीची धडक बसली. यामध्ये दोघेही दुचाकीस्वार रस्त्यावर उजव्या बाजूला जाऊन रस्त्यावर पडले.
उदय याच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने प्रचंड रक्तस्त्राव होऊन तो जागीच मृत पावला, तर संदीप पाटील हा गंभीर जखमी झाला. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी रुग्णवाहिका व पोलिसांना बोलावून घेतले. जखमीला रुग्णालयात हलविण्यास मदत केली. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. अपघाताचे वृत्त समजताच मृत व जखमींच्या नातेवाईक व मित्रांनी सांगलीच्या
शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. विच्छेदन तपासणीनंतर रात्री उशिरा उदयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
कुटुंबाचा आधार
उदय साळुंखे विवाहित असून त्याला दोन लहान मुले आहेत. त्याचे वडील अपंग आहेत. तो वाहनावर चालक म्हणून काम करीत होता. तो कुटुंबाचा आधार होता. त्याच्या अपघाती मृत्यूनंतर कुटुंबाला मानसिक धक्का बसला आहे.