संतोष भिसेसांगली : गेली अनेक वर्षे पुणे-बंगळुरु या एकमेव महामार्गाचा अभिमान बाळगणाऱ्या सांगली जिल्ह्यात आता महामार्गांचे जाळे होऊ घातले आहे. महामार्ग देखणे आणि वेगवान होत आहेत, मात्र त्यासाठी बेफाम वृक्षतोड केली जात असल्याने त्यांचा प्राण हरवत आहे. झाडे तोडल्यानंतर त्याऐवजी नव्याने लागवड व संगोपन केले जात नसल्याचा अनुभव आहे.रत्नागिरी-नागपूर महामार्गामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्याहून अधिक कमी झाला आहे. सांगलीतून सोलापूरला मोटारीने अवघ्या दोन-अडीच तासांत पोहोचणे शक्य झाले आहे. हा संपूर्ण महामार्ग अत्यंत देखणा, सुरक्षित झाला आहे, पण दुतर्फा वृक्षराजी नसल्याने त्याचे आरोग्य हरवले आहे. हा प्रवास कंटाळवाणा आणि थकवणारा ठरतो. जुन्या मिरज-पंढरपूर मार्गावरील झाडे महामार्गासाठी तोडली गेली. त्याच्या बदल्यात नव्याने झाडे लावण्याची अट महामार्ग प्राधीकरणाने घातली. त्यानुसार ठेकेदाराने झाडे लावली देखील. पण सध्या त्यांचे अस्तित्व कोठेही दिसत नाही.रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी मिरज ते अंकलीदरम्यान मोठ्या प्रमाणात झाडे तोडली आहेत. काही शेतकऱ्यांनी स्वखर्चाने त्यांचे पुनर्रोपण करुन त्यांना जीवदान दिले. मिरज-भोसे दरम्यानही शेतकऱ्यांनी झाडे वाचविण्याचा खटाटोप स्वखर्चाने केला पण या कामात महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदारांची अनास्थाच आहे. या पार्श्वभूमीवर आता नव्याने शक्तिपीठ महामार्ग आणखी काही भागाचे वाळवंट करण्याच्या मार्गावर आहे.
सांगली-मिरज रस्त्यासाठी ८५ वटवृक्ष तोडलेसांगली ते मिरज रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८५ डेरेदार आणि जुनी वडाची झाडे तोडली गेली. त्याच्या बदल्यात नव्याने झाडे लावण्यात आली. पण त्यापैकी एकही झाड जगू शकले नाही. तोडलेल्या वटवृक्षांच्या पुनर्रोपणासाठी पर्यावरणप्रेमींनी आग्रह धरला. त्याची दखल घेत मिरजेत शासकीय तंत्रनिकेतनच्या आवारात २२ वटवृक्षांचे पुनर्रोपण करण्यात आले पण त्याला नियमित पाणीपुरवठा आणि देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. परिणामी २२ पैकी एकही झाड नव्याने फुटले नाही.
नदीकाठ उजाड बनण्याचा धोकासांगलीजवळ कर्नाळ, सांगलीवाडी परिसरातून शक्तिपीठ महामार्गाचा प्रवास होणार आहे. सध्या तेथे खूपच मोठ्या प्रमाणात गर्द वृक्षराजी आहे. असंख्य प्रजातींचे पक्षी बारमाही मुक्कामाला असतात. शक्तिपीठमुळे या रम्य निसर्गाला नख लागणार आहे. थंडगार हिरवाई संपून सिमेंटच्या रस्त्याचा रखरखाट वाट्याला येणार आहे. १२ महिने २४ तास वाहनांच्या वर्दळीमुळे नदीकाठची शांतता व चैतन्य हरवणार आहे.