मुलगा देऊन घेतली मुलगी दत्तक, सांगली जिल्ह्यातील अनोखा दत्तक सोहळा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 17:11 IST2023-02-15T16:36:30+5:302023-02-15T17:11:51+5:30

अनोखा दत्तक सोहळा ठरला कौतुकाचा विषय

Adopting a girl by giving a boy, a unique adoption ceremony in Shegaon in Sangli | मुलगा देऊन घेतली मुलगी दत्तक, सांगली जिल्ह्यातील अनोखा दत्तक सोहळा 

मुलगा देऊन घेतली मुलगी दत्तक, सांगली जिल्ह्यातील अनोखा दत्तक सोहळा 

जत : बिरूदेव आणि आप्पासाहेब हे दोघे भाऊ. शेगाव (ता. जत) येथे माने वस्तीवर कुटुंबासह राहणारे. थोरल्याला दोन मुलगे, तर लहानग्याला दोन मुली. दोघांचीही इच्छा होती आपल्याला मुलगा आणि मुलगी असावी. इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून काय झाले? बंधुप्रेमाने मार्ग शोधला आणि घरातच दत्तकविधी केला.

बिरूदेवच्या आरुषला आप्पासाहेबने पदरात घेतले, तर आप्पासाहेबची अन्विता बिरूदेवच्या घराची लक्ष्मी झाली. पाहुण्या - रावळ्यांच्या साक्षीने दत्तक सोहळा रंगला. गोडाधोडाच्या पंगती उठल्या. भावंडांचे हे जगावेगळे प्रेम गावकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरले आहे.

शेगावमध्ये बिरूदेव सुखदेव माने आणि भाऊ आप्पासाहेब, आई - वडील व पत्नी, मुलांसह एकत्र कुटुंबात राहतात. बिरूदेव आरोग्य विभागात नोकरी करतात. घरात खेळत्या - बागडत्या मुलांमुळे गोकुळ नांदत होते. बिरूदेव यांना पाच वर्षांचा शिवम आणि दोन वर्षांचा आरुष हे मुलगे, तर आप्पासाहेबला चार वर्षांची संस्कृती आणि दोन महिन्यांची अन्विता या मुली. घर मुलांनी भरलेले, पण खंत कायम होती. थोरल्याला मुलगी नव्हती, तर धाकट्याला मुलगा हवा होता. दोनच पुरेत, अशी भावना असल्याने आणखी अपत्यांची इच्छाही नव्हती.

दोघांची मुले घरभर एकत्र बागडताना पाहून बिरूदेव यांना दत्तकची कल्पना सुचली. आप्पासाहेबलाही पटली. त्यांच्या कल्पनेला सौभाग्यवतींनी आनंदाने संमती दिली. बिरूदेव यांचा आरुष आप्पासाहेबांनी स्वीकारला. आप्पासाहेबांच्या नवजात अन्विताला बिरूदेव यांनी आपलीशी केली.

बारसे आणि दत्तक एकत्रच

दत्तक ठरले. पण, नवजात मुलीचे बारसे झाले नव्हते. त्यामुळे दत्तक घेण्याचा कार्यक्रम आणि बारसे एकाचवेळी झाला. बारशाच्या घुगऱ्या आणि दत्तकाचे लाडू एकाचवेळी पंगतीत वाढले. आहेर - माहेर, सत्कार सोहळा, फोटोसेशन, नवे कपडे आणि नवा पाळणा सारे काही यथासांग झाले. सोहळ्यानंतर अजाण अन्विता काकीच्या (नव्या आईच्या) कुशीत विसावली, तर खेळकर आरुष दररोजच्या सवयीने छोट्या काकीकडे (नव्या आईकडे) गेला. दोघा भावंडांनी परस्परांची मुले दत्तक घेऊन आयुष्याचा धागा जोडला.

Web Title: Adopting a girl by giving a boy, a unique adoption ceremony in Shegaon in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली