Sangli: कोकरूड येथे लवकरच अपर तहसीलदार कार्यालय होणार, शासनाकडे प्रस्ताव सादर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:13 IST2025-12-20T19:12:11+5:302025-12-20T19:13:16+5:30
६३ गावांतील नागरिकांचा हेलपाटा वाचणार

संग्रहित छाया
विकास शहा
शिराळा : शिराळा तालुक्यातील पश्चिमेकडील दुर्गम भागातील नागरिकांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हे आहेत. कोकरूड येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून, त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. यामुळे कोकरूड आणि चरण मंडळातील ६३ गावांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शिराळा तालुका भौगोलिकदृष्ट्या लांब आणि डोंगरी आहे. दुर्गम भागातील नागरिकांना साध्या कामासाठीही ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करून शिराळा शहरात यावे लागते. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होतो. ही अडचण ओळखून आमदार सत्यजीत देशमुख यांनी २५ मे रोजी शासनाकडे पत्रव्यवहार करून या कार्यालयाची मागणी केली होती. कोकरूड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची शासकीय जागा या कार्यालयासाठी उपलब्ध आहे. यामध्ये २ महसूल मंडळे, १६ सजा आणि एकूण ६३ गावे, वाड्या-वस्त्यांचा समावेश असेल. चांदोली धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या १८ गावांचाही यामध्ये समावेश आहे.
कार्यक्षेत्रातील महत्त्वाची गावे
कोकरूड मंडल : कोकरुड, बिळाशी, मांगरूळ, खूजगाव, रीळे, येळापूर, मेनी. चरण मंडल : चरण, काळुंद्रे, पनुंब्रे तर्फे शिराळा, आरळा, सोनवडे, मणदूर, पाचगणी, पेटलोंड, निवळे. धरणग्रस्त १८ गावे : पेटलोंड, कोन्होली, सिद्धेश्वर, आळोली, नांदोली, देव्हारे, आंबोली, भोगाव, निवळे, चांदोली खुर्द, चांदोलीबुद्रुक, रुंदिव, जावळी, वेत्ति, झोळंबी, गवे, लोटीव, टाकळे.
२० पदे प्रस्तावित
या कार्यालयासाठी तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, निवडणूक नायब तहसीलदार, संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार, अव्वल कारकून ३, लिपिक ४, शिपाई ४ आणि वाहनचालक अशी पदे प्रस्तावित आहेत.
"चरण आणि कोकरूड परिसरातील जनतेला छोट्या कामांसाठी शिराळ्याला यावे लागते, ज्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. यामुळे नागरिकांनी मागणी केली होती. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी आम्ही कोकरूड येथे अपर तहसीलदार कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासन स्तरावर सकारात्मक हालचाली सुरू असून लवकरच हे कार्यालय कार्यान्वित होईल." - सत्यजीत देशमुख, आमदार