आष्टा : आष्टा शहरात मंजूर टेंडरवरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वाळवा तालुकाध्यक्ष संग्राम जाधव व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रवीण माने यांच्यात नगरपरिषदेतच दोघांमध्ये शिवीगाळ होऊन अंगावर धावून जाण्याचा प्रकार यावेळी घडला. आष्टा नगरपरिषदेच्या आवारात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जमा झाले. ही घटना मंगळवारी दुपारी चारच्या दरम्यान घडली.आष्टा नगरपालिकेच्यावतीने आष्टा शहरात वार्षिक रस्ते विकास नफा-तोटा निधी योजनेच्या माध्यमातून बोळ, रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्यांचे खडीकरण या कामांची निविदा प्रक्रिया राबविली. ठेकेदारांनी बयाणा रक्कम भरून टेंडर फॉर्म भरला. मात्र त्यावर ठेकेदार मुसळे यांच्यावतीने मोहन तावदर हे नाव व मोबाईल नंबर भरण्यास बाहेर आले असता, एका राजकीय पक्षाच्या काहीजणांनी दमदाटी करून त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले व टेंडर फॉर्म जमा करण्याची वेळ संपल्यानंतर सोडून दिले.यावेळी युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, अमित ढोले, राजकेदार आटुगडे, महेश पाटील, अमोल अवघडे, गुंडाभाऊ मस्के, अभिजित वग्यानी, कपिल कदम कुणाल काळोखे आदींनी नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांना निवेदन दिले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बिहार राज्याप्रमाणे आष्टा शहरात दडपशाही केली आहे. प्रशासनाने निविदा प्रक्रिया निकोप पद्धतीने राबवायला हवी होती. प्रशासनाने तातडीने ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा निकोप पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवावी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत -संग्राम जाधव, अध्यक्ष , युवक राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष
आमच्याकडून कोणालाही मारहाण झालेली नाही. विरोधक बिनबुडाचे आरोप करीत आहेत. - प्रवीण माने, अध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा