पलूसला शासकीय इमारतीत अस्वच्छता

By Admin | Updated: February 2, 2015 00:03 IST2015-02-01T22:42:52+5:302015-02-02T00:03:44+5:30

सर्वत्र घाणीचे साम्राज्य : शौचालयांची दुरवस्था; पाण्याअभावी वापर बंद

Absence in Palusa government building | पलूसला शासकीय इमारतीत अस्वच्छता

पलूसला शासकीय इमारतीत अस्वच्छता

किर्लोस्करवाडी : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, निर्मलग्राम मोहीम, महात्मा गांधी तंटामुक्त अभियान, डिजिटल तालुका, इको व्हिलेज या सर्व शासकीय योजनांमध्ये प्रभावीपणे काम करून राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या पलूस तालुक्याची मध्यवर्ती शासकीय इमारत मात्र अस्वच्छतेच्या गर्तेत आहे. घाणीने ग्रासलेल्या या इमारतीचे ग्रहण कधी सुटणार? याची चर्चा संपूर्ण तालुक्यातून विविध कामे घेऊन येणारे नागरिक करू लागले आहेत.पाच कोटी रुपये खर्च करून मध्यवर्ती इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये पुरुष व महिला कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या सर्व स्वच्छतागृहात इमारत वापरात आल्यानंतर केवळ काही महिनेच पाणी होते. त्यानंतर आजअखेर या इमारतीत पाण्याअभावी अस्वच्छता आहे. तसेच सर्व स्वच्छतागृहे कुलूपबंद व दुर्गंधी असल्याने कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.या इमारतीत दुय्यम निबंधक, भूिमअभिलेख, सामाजिक वनीकरण, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, मंडल कृषी अधिकारी, कोषागार आदी कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांतून वर्गणी गोळा करुन पाण्याचे कनेक्शन होते. तेव्हा एका कामगाराद्वारे सर्व स्वच्छतागृहांची तसेच परिसराची (इमारतीची) साफसफाई केली जात होती. परंतु पाणी बंद झाल्यानंतर ही स्वच्छता २०११ पासून आजतागायत बंदच आहे. मात्र प्रत्येक कार्यालयातील कर्मचारी आपल्या कार्यालयातील स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु स्वच्छतागृहे व शौचालयामध्ये पाण्याचा वापर बंदच आहे. त्यामुळे दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण झाली आहे. महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
पाण्यासाठी मध्यवर्ती इमारतीतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पलूस तहसीलदार, बांधकाम विभागास तोंडी व लेखी निवेदन देऊन पाणी सुरू करण्यासाठी मागणी केली होती. परंतु याबाबत गंभीरपणे विचार होत नाही. लोकप्रतिनिधींनी कठोर भूमिका घेऊन इमारतीच्या या समस्येचे निराकरण करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Absence in Palusa government building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.