सांगलीच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:19 IST2022-07-26T17:19:14+5:302022-07-26T17:19:35+5:30
‘लोकमत’ने १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. हे वृत्त खरे ठरले.

सांगलीच्या शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे आदेश
सांगली : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सांगली जिल्ह्यातील शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी मंगळवारी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हाप्रमुखपदी आता अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्ह्यात खानापूर व इस्लामपूर येथील दोन महत्त्वाचे नेते पक्षातून गेल्याने याठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना अधिक संधी देण्यात आली आहे. खानापूर मतदारसंघातून आ. अनिल बाबर तर इस्लामपूरमधील आनंदराव पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. पवार यांच्याजागी आता वाळवा तालुक्यातीलच चिकुर्डे येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील यांना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे खानापूर व आटपाडी या दोन्ही तालुक्यात पक्षविस्तार करण्यासाठी शिवसेनेने याठिकाणी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे.
नव्या कार्यकारिणीत उपजिल्हाप्रमुखपदी गौरीशंकर भोसले (खानापूर विधानसभा), उपजिल्हा संघटकपदी संतोष पाटील (सांगली विधानसभा), पांडुरंग (दादा), भगत (खानापूर पूर्व), राज लोखंडे (खानापूर पश्चिम तालुका), सुभाष जगताप (आटपाडी पूर्व), मोहन देशमुख (आटपाडी पश्चिम) , नागनाथ मोटे (जत पूर्व), विशाल चव्हाण (पलूस तालुका), तालुका संघटकपदी महेश गव्हाणे (मिरज पश्चिम), सांगली शहर संघटकपदी हरिदास पडळकर, अमोल कांबळे, अरूण बाबर, अभिजित शिंदे यांची तर शहर समन्वयकपदी प्रसाद रिसवडे आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले
‘लोकमत’ने १४ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी अभिजीत पाटील यांची निवड होण्याची शक्यता वर्तविली होती. हे वृत्त खरे ठरले.
खानापूर, इस्लामपूरवर लक्ष
जिल्ह्यात खानापूर व इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. याठिकाणी पक्षाची नव्याने बांधणी करण्यात येणार असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.