सांगली : इन्स्टाग्रामवरून मैत्री करून सांगलीतील तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करून १२ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित ऋषीकेश ब्रह्मदेव माळी (रा. वकील वस्ती, इंदापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पीडिता आणि संशयित माळी यांचे इन्स्टाग्रामवर अकाउंट आहे. पीडिता सांगलीत खासगी नोकरी करते. जून २०२३ मध्ये माळी याने पीडितेशी इन्स्टाग्रामवर मैत्री निर्माण केली. दोघांची ओळख झाल्यानंतर व्हॉट्सॲप, फेसबुकवरूनही मेसेजची देवाण-घेवाण सुरू झाली. त्यानंतर दोघे जण मोबाइलवरून एकमेकांशी बोलू लागले. माळी याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. पीडितेला त्याच्याविषयी विश्वास निर्माण झाला. या ओळखीतून माळी याने तिच्याकडून १० लाख २८ हजार ६९८ रुपये व २ लाख ७१ हजार ३०२ रुपयांचे सोन्याचे दागिने असा १३ लाख रुपयांचा ऐवज घेतला.माळी याने पीडितेला लग्न करणार असल्याचे सांगून धामणीजवळील हॉस्पिटलशेजारी असलेल्या शेतात, धामणीत रस्त्याकडेला शेतात तसेच तासगाव येथील बसस्थानकाजवळील लॉजवर शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी २०२५ पर्यंत माळी याने पीडितेशी अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्न करणे टाळले. पीडितेने याबाबत त्याला वारंवार विचारणा केली. तसेच घेतलेल्या पैशाची मागणी केल्यानंतर १३ लाख रुपयांपैकी केवळ एक लाख रुपये परत केले. उर्वरित बारा लाख रुपये अद्याप दिले नाहीत.
माळी याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यानुसार माळी याच्याविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अद्याप अटक केली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.