सांगली महापालिकेत नोकरीसाठी बनावट नियुक्तीपत्र देऊन तरुणाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 18:28 IST2025-11-05T18:27:37+5:302025-11-05T18:28:57+5:30
नोकर भरतीचा आणखी एक घोटाळा उघडकीस : एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज

सांगली महापालिकेत नोकरीसाठी बनावट नियुक्तीपत्र देऊन तरुणाची फसवणूक
सांगली : महापालिकेत कनिष्ठ लिपिक पदासाठी खोटे नियुक्तीपत्र व बोगस सुरक्षा अनामत रकमेची पावती देऊन दिनेश पुजारी याने महापालिकेसह एका तरुणाची ३ लाख ४० हजारांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पुजारीवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात महापालिकेने सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी हा अर्ज दिला आहे. महापालिकेतील आयुक्तांशी माझे चांगले संबंध असून भरती प्रकियेतून नियुक्ती करून देतो, असे सांगून दिनेश पुजारी याने खणभाग येथील वैभव रावसाहेब दानोळे याची फसवणूक केली. पुजारीने दानोळे यांच्याकडून टप्प्या-टप्प्याने ३ लाख ४० हजार रुपये घेतले.
अतिरिक्त आयुक्तांच्या स्वाक्षरीचा ‘कनिष्ठ लिपिक’ पदाचा बोगस नियुक्तीचा आदेश आणि महापालिकेचे खोटे ओळखपत्र दानोळे यांना दि. ३० सप्टेंबर २०२५ ला दिले होते. दानोळे यांनी सादर केलेले नियुक्ती पत्र, स्वाक्षरी, संपूर्ण मजकूर आणि दि. ४ सप्टेंबर २०२५ ला ३५ हजार रुपये रकमेची बोगस सुरक्षा अनामत पावती पूर्णतः खोटी असल्याचे महापालिकेच्या चौकशीत उघड झाले आहे.
याप्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांनी चौकशीचे आदेश दिले होते. याचा चौकशी अहवाल तयार झाला. यामध्ये महापालिकेच्या कनिष्ठ लिपीक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून खणभाग येथील वैभव रावसाहेब दानोळे यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. तर मनपाचे बोगस दाखले देखील आढळून आले. त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात दिनेश पुजारी यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. दरम्यान, दिनेश पुजारी याने नरसोबावाडी आणि तासगाव येथील अन्य दोन व्यक्तींनाही अशाच प्रकारे खोटे नियुक्तीपत्र दिले असल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी अमिषाला बळी पडू नये : आयुक्त
महापालिकेत सध्या नोकर भरती प्रक्रिया सुरू नाही. नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला नागरिकांनी बळी पडू नये. महापालिकेच्या सर्व अधिकृत सूचना अधिकृत संकेतस्थळावर किंवा प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिल्या जातात. नागरिकांनी अशा खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवण्यापूर्वी प्रशासनाशी संपर्क साधून सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे.