मिरज : कोल्हापुरातून येऊन मिरजेत दुचाकी चोऱ्या करणाऱ्या चोर अजय बाळासाहेब पटकारे (वय ४३, रा. सदर बाजार, कोल्हापूर) या अट्टल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपये किमतीच्या सात दुचाकी जप्त करण्यात आल्या.मिरज शहरात वारंवार दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने दुचाकी चोरीत सक्रिय असलेला कोल्हापुरातील रेकॉर्डवरील अट्टल दुचाकी चोर अजय पटकारे याच्यावर पाळत ठेवली. दि. ११ सप्टेंबर रोजी पटकारे हा मिरजेत हिरा हॉटेल चौकात चोरलेली दुचाकी घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहा पोलिस निरीक्षक आण्णासाहेब गादेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने पटकारेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चोरलेली दुचाकी असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत पटकारेने मिरज शहर व परिसरातून चोरलेल्या ७ दुचाकी हस्तगत करून ७ गुन्हे उघडकीस आणले. पटकारे याने आतापर्यंत तब्बल ३५ दुचाकी चोरी केल्या आहेत. चोरीसाठी तो कोल्हापूरहून मिरज परिसरात येऊन विविध दुचाकी लंपास करीत असे. पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा व पोनि किरण रासकर यांनी तपास पथकाला मार्गदर्शन केले. पटकारे यास न्यायालयाने दि. १३ पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. पटकारे याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे उपाधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी सांगितले.
कोल्हापूरहून येऊन मिरजेत दुचाकी चोरणारा चोरटा गजाआड, सात दुचाकींसह सव्वा दोन लाखांचा माल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 13:51 IST