सांगली : समडोळी (ता. मिरज) येथे चोरट्यांनी घर फोडून २५ हजारांचा ऐवज लंपास केला. यावेळी जागे झालेल्या माय- लेकींनी चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चाकूने त्यांच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी गंगाबाई मोतीराम राठोड (रा. इंदिरा वसाहत, समडोळी ) यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.चोरट्याकडून दोघींवर हल्ला करण्यात आल्याने पोलिसांनीही याची गंभीर दखल घेत तातडीने तपास सुरू केला आहे. मंगळवारी रात्री फिर्यादी गंगाबाई आणि त्यांची मुलगी घरी झाेपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने घरात शिरून घरातील रोख २२ हजार आणि दोन मोबाइल आणि इतर साहित्य असा २५ हजारांचा ऐवज लंपास केला. आवाज येताच फिर्यादी गंगाबाई यांना जाग आली. यावेळी दोघींनीही धाडसाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार करू लागल्याने चाेरट्याने थेट चाकू काढून त्यांच्यावरच हल्ला केला. यात गंगाबाई यांच्या बोटाजवळ जखम झाली आहे. सांगली ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत.
Sangli: चोरट्याने माय-लेकींवर चाकूने हल्ला करत २५ हजार लुटले
By शरद जाधव | Updated: October 4, 2023 18:43 IST