पुनवत : चिंचोली (ता. शिराळा) येथील चित्रकार अशोक जाधव यांनी रक्ताने पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावर मराठा योद्धा मनोज जरांगे व छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र साकारून मराठा आंदोलनास अनोखा पाठिंबा दिला.चिंचोली येथील चित्रकार अशोक जाधव यांनी आजपर्यंत पिंपळपानावरची शेकडो चित्रे साकारली आहेत. सध्या मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे व बांधवांना पाठिंबा देण्यासाठी हे अनोखे चित्र साकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसून, तलवार उगारून मोहीम फत्ते करण्यासाठी निघाले असल्याचे या चित्रात दाखवले आहे. तसे मनोज जरांगे-पाटील आरक्षणाची मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबईला गेले आहेत. म्हणून शिवाजी महाराज आणि मनोजदादाचे चित्र एकाच पानावर रेखाटले आहे. ही कलाकृती लक्षवेधी ठरली आहे.
गौतम बुद्धांनी पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञान प्राप्त करून जगाला शांततेचा संदेश दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्येयाने, निर्धाराने आणि गौतम बुद्धांच्या शांततेच्या संदेशाचे आचरण करीत जरांगे-पाटील हे आंदोलनाचा लढा लढत आहेत. म्हणून पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावर चित्र रेखाटले आहे. - चित्रकार अशोक जाधव, चिंचोली