सांगली: नेर्लेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वर्षातील चौथी घटना
By श्रीनिवास नागे | Updated: September 24, 2022 17:28 IST2022-09-24T17:28:09+5:302022-09-24T17:28:39+5:30
वाळवा तालुक्यातील महामार्ग परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. वर्षभरात या ठिकाणी चौथ्या बिबट्याचा मृत्यू

सांगली: नेर्लेत महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार, वर्षातील चौथी घटना
सांगली : नेर्ले (ता. वाळवा) येथील राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ सात महिन्याच्या मादी बिबट्याचा दुचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना काल, शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली.
राष्ट्रीय महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पूर्वेकडून पेठच्या बाजूला हा बिबट्या महामार्ग ओलांडत होता. रस्ता ओलांडून जाण्याचा अंदाज नसल्याने रस्ता ओलांडताना बिबट्याला दुचाकीची धडक बसली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तवला आहे. या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला.
वाळवा तालुक्यातील महामार्ग परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. वर्षभरात या ठिकाणी चौथ्या बिबट्याचा मृत्यू झाला आहे. रात्री घटना घडल्यानंतर अपघाताच्या ठिकाणी वनविभागाचे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत बिबट्याचे शव ताब्यात घेतले. इस्लामपूर येथे शवविच्छेदन करण्यात आले. हा बिबट्या वयाने लहान असल्याने दुचाकीच्या धडकेत ठार झाल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला. घटनास्थळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक दीपाली सागावकर, अमोल साठे, प्राणी मित्र युनूस मणेर उपस्थित होते. आधार ऍनिमल रिस्पेक्टचे प्रा. विजय लोहार, बापू कांबळे यांनी वनविभागास माहिती दिली.
बेशुद्ध बिबट्याने ठोकली धूम
दोन महिन्यापूर्वी याच ठिकाणांहून काही अंतरावर एका बिबट्याला चारचाकी गाडीची धडक बसली होती. परंतु या धडकेत घाबरलेला बिबट्या महामार्गावर तसाच बेशुद्ध पडून होता. पंधरा ते वीस मिनिटांतच हा बिबट्या शुद्धीवर आल्यानंतर तो सुसाट उसाच्या शेतामध्ये पळून गेला होता. त्यावेळी मात्र बिबट्याला बघण्यासाठी आलेल्या अनेकांची भंबेरी उडाली होती.