सांगलीतील चिंचणीत सापडले चार फुटांचे मांडूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 17:01 IST2023-10-21T17:01:24+5:302023-10-21T17:01:34+5:30
देवराष्टे : चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथील लोकवस्तीत एका घरात उंदराच्या बिळात घुसलेला मांडूळ तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर ...

सांगलीतील चिंचणीत सापडले चार फुटांचे मांडूळ
देवराष्टे : चिंचणी-अंबक (ता. कडेगाव) येथील लोकवस्तीत एका घरात उंदराच्या बिळात घुसलेला मांडूळ तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढला. चार फूट लांबीचा एवढा मोठा मांडूळ पाहून सर्वजण चक्रावून गेले. सर्पमित्र महेश पाटील यांनी त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. वनविभागाला याची माहिती दिली. अंधश्रद्धेमुळे मांडुळाचा बळी जाऊ नये यासाठी गोपनीयपणे मांडूळ पकडून सुखरूप सोडले.
नैसर्गिकदृष्ट्या मांडूळ साप तीन ते साडेतीन फूट लांब व जाडजूड असतो. तो बिनविषारी असतो. पण चिंचणीत सापडलेला मांडूळ हा चार फूट लांबीचा जाडजूड होता. तो मादी असल्याचे सांगण्यात आले.
चिंचणीतील एका घरात साप शिरल्याचे घर मालकाच्या लक्षात आले. त्यांनी सर्पमित्र महेश पाटील यांना याबाबत कळवले. पाटील यांनी तत्परता दाखवली. परंतु तो बिळात गेल्यामुळे बाहेर काढणे अवघड होते. संबंधित घरातील सर्वजण साप असल्यामुळे जीव मुठीत धरून बसले होते. पहिल्याच दिवशी मांडूळ असल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याला जिवंत पकडण्यासाठी परिसरात खुदाई केली. पण मोठे बीळ असल्यामुळे मांडूळ हाताला लागणे अवघड झाले होते.
तीन दिवस घरातील लोक नजर ठेवून होते. अखेर तीन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मांडूळ पहाटेस बिळाबाहेर आला. त्यामुळे पकडणे शक्य झाले. एवढा मोठा मांडूळ आजपर्यंत कोणाच्या नजरेस पडला नव्हता. बिळातून बाहेर काढल्यानंतर चार फुटांपेक्षा मोठा पूर्ण वाढ असलेला मांडूळ पाहून बघणारे चक्रावून गेले.
सर्पमित्र महेश पाटील यांनी अनेक बाबतीत गुप्तता ठेवली. पकडलेला मांडूळ हा कोणत्याही प्राण्याचे भक्ष बनू नये याची काळजी घेतली. वनविभागाला कळवून रात्रीच्या वेळी मऊ मातीच्या ठिकाणी रानात सोडून दिले. पाटील यांना संदीप चौगुले, विशाल पवार यांचे सहकार्य लाभले.