सोलापूरची माऊली हरवली ओडिशात; सांगलीच्या अधिकाऱ्यांकडून घरवापसी, दीड वर्ष कुठं, कस राहिल्या..वाचा
By अशोक डोंबाळे | Updated: December 10, 2025 16:27 IST2025-12-10T16:24:02+5:302025-12-10T16:27:41+5:30
ओडिशाच्या जिल्हाधिकाऱ्यांची तत्परता

सोलापूरची माऊली हरवली ओडिशात; सांगलीच्या अधिकाऱ्यांकडून घरवापसी, दीड वर्ष कुठं, कस राहिल्या..वाचा
अशोक डोंबाळे
सांगली : बार्शीच्या सुभाषनगरातील ७० वर्षीय विजयाबाई रघुनाथ जाधव... या माऊली म्हणजे कुटुंबाचा धागा… पण दीड वर्षांपूर्वी त्या घरातून निघाल्या आणि परत कधीच दिसल्या नाहीत. त्यांच्या पावलांचे आवाज थांबले, पण त्यांची आठवण मात्र घरभर दररोज फिरत राहिली.
रात्रंदिवस शोध, पोलिसात तक्रारी, अन् “आमच्या माऊली दिसल्या का, अशी सोशल मीडियावर हाक दिली, तरीही प्रतिसाद शून्य… कुटुंब माऊलीच्या आठवणींनी गहीवरलं. पण नियती एका दूरच्या कोपऱ्यात चमत्कार विणत होती.
ओडिशातील झारसुगडाच्या एका छोट्या गावात विजयाबाईंना आश्रय मिळाला होता. भाषेची अडचण, ओळखीचे कोणी नाही, गाव अनोळखी, पण स्थानिक नागरिकांची माया आणि प्रशासनाची जबाबदारी यांनी त्यांना कवटाळून ठेवले होते. हे जणू काळाने दिलेली मायेची सावलीच.
खरी कहाणी इथूनच सुरू झाली. झारसुगडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण यांच्या संवेदनशील नजरेने हा विषय ओळखला. विजयाबाई काहीतरी हरवलेल्या आहेत, हे त्यांना जाणवलं. त्यांनी तपशील काढला, फोटो काढला आणि थेट सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याशी संपर्क साधला.
नरवाडे यांनी क्षणाचाही विलंब न करता सोशल मीडियावर विजयाबाईंचे फोटो आणि माहिती प्रसारित केली. आणि मग एक पोस्ट, एक क्षण, एक स्क्रीन… आणि बार्शीतील कुटुंबाच्या अंगावर शहारा! “ही आमची माऊली!”अश्रूंची धार वाहू लागली, घरात जणू आनंदी वातावरणानं चाहुल दिली.
मानवाधिकार दिनी मिलनाचा सोहळा
हरवलेली माऊली सापडली. तेही आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनी. माणुसकीच्या सर्वात मोठ्या उत्सवाच्या दिवशी. आज, १० डिसेंबर रोजी झारसुगडाहून अधिकारी स्वतः विजयाबाईंना घेऊन सांगलीत दाखल होणार आहेत. सकाळी ११ वाजता सांगली जिल्हा परिषद कार्यालयात औपचारिक माऊलीला सोपविण्याचा कार्यक्रम होत आहे.
ही फक्त एक घरवापसी नाही…
ही श्रद्धेची, मानवतेची आणि संवेदनांच्या धाग्यांनी विणलेली कथा आहे. हरवलेली माऊली पुन्हा सापडण्याचा हा क्षण मानवतेचा खरा सोहळा ठरत आहे. आज बार्शीची माऊली घरी परतत आहे आणि तिच्या स्वागतासाठी प्रशासकीय अधिकारी अन् ताटातूट झालेल्या कुटुंबातील सदस्य भावनांनी सज्ज आहेत.