कोल्हापूरमधील महिलेचे ७ तोळे दागिने सांगलीत लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 13:16 IST2017-10-23T13:10:59+5:302017-10-23T13:16:29+5:30
सांगली ते समडोळी बसमधून प्रवास करणाऱ्या सुनंदा दिलीप कोळी (रा. कोल्हापूर) या महिलेचे सात तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेला २४ तासांचा कालावधी होत आला तरी, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ कच्ची नोंद करुन घेण्यातच पोलिसांनी धन्यता मानली आहे.

कोल्हापूरमधील महिलेचे ७ तोळे दागिने सांगलीत लंपास
सांगली ,दि. २३ : सांगली ते समडोळी बसमधून प्रवास करणाऱ्या सुनंदा दिलीप कोळी (रा. कोल्हापूर) या महिलेचे सात तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. या घटनेला २४ तासांचा कालावधी होत आला तरी, शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. केवळ कच्ची नोंद करुन घेण्यातच पोलिसांनी धन्यता मानली आहे.
सुनंदा कोळी यांचे समडोळी (ता. मिरज) माहेर आहे. दिवाळीसाठी त्या माहेरी निघाल्या होत्या. त्यांनी दागिने पिशवीत ठेवले होते. कोल्हापुरातून त्या सांगलीच्या मुख्य बस स्थानकावर आल्या. तेथून त्या रात्री साडेआठ वाजता शहरी बसने समडोळीला निघाल्या होत्या.
बस कर्नाळ पोलिस चौकीजवळ गेल्यानंतर तेथे तिकीट तपासणी पथक आले होते. त्यामुळे बस थांबली होती. कोळी यांनी तिकीट पिशवीत ठेवले होते. पथकाला तिकीट दाखविण्यासाठी त्यांनी पिशवी उघडली असता, पिशवीत दागिने नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
त्यांनी वाहकाला याची माहिती दिली. वाहकाने शहर पोलिसांना पाचारण केले. पोलिस तातडीने दाखल झाले. हजारे प्लॉटनजीक बसमधील प्रवाशांकडे चौकशी केली. पण दागिने सापडले नाहीत.
सुनंदा कोळी तक्रार देण्यास पोलिस ठाण्यात गेल्या असता, पोलिसांनी केवळ कच्ची नोंद करुन घेतली गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. दरम्यान सांगली शहर परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
परप्रांतियांची चौकशी
समडोळी रस्त्यावर बन्सी पेपर मिलजवळ तीन परप्रांतीय तरुण बसमधून उतरल्याचे वाहकाच्या लक्षात आले. वाहकाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मिलजवळ राहणाऱ्या परप्रांतीयांची चौकशी केली. त्यांच्या खोलीचीही झडती घेतली. परंतु तरीही चोरीचा सुगावा लागला नाही.