जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान
By संतोष भिसे | Updated: October 30, 2022 14:09 IST2022-10-30T14:02:41+5:302022-10-30T14:09:07+5:30
लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली.

जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत केली फस्त; लिंगनूर येथे लाखोंचे नुकसान
लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथे अवधूत आणि शिवदूत शंकर माळी या २०-२२ वर्षांच्या भावंडांनी जीवापाड वाढविलेली द्राक्षबाग वटवाघुळांनी एका रात्रीत फस्त केली. सुमारे सात लाख रुपयांची द्राक्षे नष्ट झाली. या दणक्याने तरुण शेतकरी कोलमडून गेले आहेत.
लिंगनूरमध्ये पाझर तलावानजिक त्यांची आरके जातीची द्राक्षबाग होती. गेली १०-१५ वर्षे माळी कुटूंब द्राक्षे पिकविते. यावर्षी वडील अंथरुणाला खिळून असल्याने भावंडांनीच बाग सांभाळली. चांगल्या दराच्या अपेक्षेने जूनमध्ये आगाप छाटणी घेतली. पाऊस, वाऱ्या-वादळापासून बचावासाठी छत घातले. बागेतील माती व चिखलामुळे द्राक्षघड खराब होऊ नयेत यासाठी सरींमध्येही कागद अंथरला. ट्रॅक्टर चालविल्यास, कागद फाटेल म्हणून पाईपने औषधे फवारली. बाग चांगलीच फळली. धुवॉंधार पावसातही टिकून राहिली. व्यापाऱ्यांनी ५३० रुपयांना चार किलो असा विक्रमी भाव सांगितला. दिवाळीनंतर उतरणीचे नियोजन होते, तत्पूर्वीच वटवाघुळांचा हल्ला झाला.
शेकडो वटवाघळांनी एका रात्रीत बाग उध्वस्त केली. पक्व द्राक्षघड खाऊन, तोडून टाकले. बागेत रात्रभर धिंगाणा घातला. अवधूतला सकाळी बागेत द्राक्षांचा सडा आणि चिखल दिसून आला. हा दणका न पेलवणारा ठरला आहे.
दिवे लावा, जाळी मारा
माळी बंधूंची घराजवळच आणखी अर्धा एकर द्राक्षबाग आहे. तेथे जानेवारीत उत्पन्न सुरु होईल. वटवाघुळांचे हल्ले पाहता अवधूतने या बागेभोवती तातडीने जाळी मारली. बागेत रात्रभर प्रखर दिवे सुरु ठेवले. यामुळे वटवाघुळांच्या बंदोबस्ताची आशा आहे.
महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर
रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग आणि हेरवाड-दिघंची राज्यमार्गासाठी मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यांत हजारो झाडांची कत्तल झाली. त्यामुळे वटवाघुळांची निवासस्थाने हरविली. विशेषत: अतिशय जुनी वडाची व पिंपळाची झाडे तोडण्यात आल्याने वटवाघुळांना निवारा राहिला नाही. सैरभैर झालेली वटवाघुळे आता शेतकऱ्यांच्या बागांत घुसू लागली आहेत. द्राक्षे, पपई, चिकू, पेरु, रामपळ, सिताफळ आदी फळबागांची नासाडी करत आहेत. महामार्ग शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे.
बागेसाठी सुमारे चार लाख रुपये खर्च केले होते. सहा-सात लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते. पण साऱ्यावरच पाणी पडले. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेली शेती आस्मानी संकटात अशी मातीमोल होत असेल, तर शासनाने मदतीचा हात पुढे करायला हवा. तरच शेतकरी तग धरेल.
- अवधूत माळी, लिंगनूर