जिल्ह्यात ६९%मतदान

By admin | Published: February 21, 2017 11:22 PM2017-02-21T23:22:40+5:302017-02-21T23:22:40+5:30

८२४ उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद : उन्हाच्या झळा सोसतच मतदारांनी बजावला हक्क

69% voting in the district | जिल्ह्यात ६९%मतदान

जिल्ह्यात ६९%मतदान

Next



सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवारी सातारा जिल्ह्यात सरासरी ६८.६६ टक्के मतदान झाले. १९ लाख ६६ हजार १३ पैकी १३ लाख ४९ हजार ८८२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही ठिकाणी मशीन बदलाव्या लागल्या. तुरळक आक्षेपाच्या घटना वगळता मतदान शांततेच्या वातावरणात पार पडले.
जिल्हा परिषदेच्या ६४ व पंचायत समितीच्या १२८ अशा एकूण १९२ जागांसाठी मंगळवारी मतदान घेण्यात आले. सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. दुपारी साडेतीनपर्यंत खंडाळ्यात ६१.४४ टक्के व कऱ्हाड तालुक्यात ६१.७७ टक्के मतदान झाले होते. या दोन तालुक्यात सर्वाधिक मतदान झाले असून खंडाळा तालुक्यात ७५.३८, तर कऱ्हाड तालुक्यात ६३.२१ टक्के इतके मतदान झाले.
खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे मतदानासाठी आलेल्या ठकुबाई एकनाथ नेवसे (वय ८३) या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. मतदान केंद्रावर आल्या असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना नायगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मिरजे, ता. खंडाळा येथे मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली होती. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ववत करण्यात आली. महाबळेश्वर शहरात मंगळवारी आठवडी बाजार होता. निवडणुकीतील मतदान प्रक्रिया मंगळवारीच असल्याने प्रशासनाने ऐनवेळी आठवडी बाजार रद्द केल्याचा निर्णय घेतल्याने खरेदीसाठी आलेले लोक व विक्रेते यांची चांगलीच धांदल उडाली. नागठाणे, ता. सातारा येथील मतदान केंद्रावर कुठल्याही उमेदवाराला मतदान केले तरी ते भाजपच्या उमेदवारालाच मिळत असल्याची तक्रार तेथील इतर पक्षांच्या उमेदवारांनी केली. याची माहिती मिळताच खासदार उदयनराजे भोसले घटनास्थळी हजर झाले. तसेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदान केंद्राला भेट दिली. या मशीनमध्ये त्रुटी असल्याने ती बदलण्याची सूचना आमदारांनी केंद्राध्यक्षांना केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती देशमुख यांच्या सूचनेनंतर ही मशीन बदलण्यात आली.
२ हजार ५८४ मतदान केंद्रांवर १६ हजार ९८२ निवडणूक कर्मचारी कार्यरत होते. ५ हजार ८९४ पोलिस अधिकारी व कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून होते.
ठळक घटना
नागठाणे, ता. सातारा केंद्रावर कुठल्याही उमेदवाराला मतदान
केले तरी एकाच उमेदवाराला मिळत असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर मशीन बदलण्यात आली
सातारा तालुक्यात एकूण तीन मशीन बदलल्या
च्शाहूपुरी, ता. सातारा येथे प्रशासनाने ऐनवेळी मतदार याद्या पुरविल्या
मिरजे, ता. खंडाळा येथे
उशिरापर्यंत मतदान
तरडगावला अनेकजण मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित

Web Title: 69% voting in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.