सांगली : रासायनिक खते, कीटकनाशकांमुळे शेती आणि माणसांचे आरोग्य बिघडत आहे. म्हणूनच केंद्र शासनाने नैसर्गिक शेतीचे मळे फुलविणाऱ्या कृषी सखींना मानधन देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्ह्यातील ६ हजार ७५० शेतकऱ्यांची निवड केली आहे. राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत गटांतील (क्लस्टर) शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींच्या मानधनासाठी जिल्ह्याला १ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रोत्साहन भत्ता व मानधन जमा होणार आहे.निसर्गावर आधारित शाश्वत शेती प्रणालीला प्रोत्साहन देणे, शेतावर तयार केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर करणे, बाहेरून निविष्ठा खरेदीवरील अवलंबित्व कमी करणे व त्यावरील खर्च कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे, गो पशुधन एकात्मिक कृषी पद्धतीचा अवलंब करणे, नैसर्गिक शेतीतील अनुभवाच्या आधारे नैसर्गिक शेतीच्या स्थानिक पद्धती विकसित करणे, रसायनमुक्त शेतमालासाठी एक राष्ट्रीय ब्रँड तयार करणे ही या अभियानाची उद्दिष्टे आहेत.जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटांतील शेतकऱ्यांना प्रतिएकर प्रत्येकी चार हजारांचा प्रोत्साहन भत्ता तर प्रतिगट दोन कृषी सखींना दरमहा प्रत्येकी पाच हजारांचे मानधन दिले जाणार आहे. या योजनेस एप्रिलमध्ये राज्य सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींना मानधनापोटी जिल्ह्याला १ कोटी ८८ लाख ९२ हजारांचा निधी मिळाला आहे. त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू असून लवकरच त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.राष्ट्रीय नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण कृषी सखींना दिले आहे. या शेतकऱ्यांना कांचनपूर येथील कृषी विज्ञान केंद्र, कसबे डिग्रज येथे एका दिवसाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच गटातील शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठीचे कृषी सखी प्रशिक्षण देणार आहेत. या गटांची नोंदणी सुरु झाली आहे.
तालुकानिहाय शेतकरी संख्या
- मिरज- ७५०
- वाळवा- ७५०
- शिराळा- ३७५
- पलूस- ५००
- कडेगाव- ७५०
- तासगाव- ६२५
- विटा- ७५०
- आटपाडी- ७५०
- कवठेमहांकाळ- ७५०
- जत- ७५०
- एकूण- ६७५०
योजनेच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीवर दृष्टिक्षेप
- गटांची संख्या : ५४
- प्रतिगट शेतकरी संख्या : १२५
- एकूण शेतकऱ्यांची संख्या : ६७५०
- प्रतिशेतकरी प्रोत्साहन भत्ता : ४०००
- एकूण कृषी सखी : १०८
- कृषी सखींना मानधन : ५०००
- जिल्ह्यासाठी निधी : १९७९८०००
राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानांतर्गत जिल्ह्यात स्थापन झालेल्या गटांतील शेतकन्यांना प्रोत्साहन भत्ता व कृषी सखींना मानधन देण्यासाठी जिल्ह्याला एक कोटी ९७ लाख ९८ हजारांचा निधी प्रास झाला आहे. गट व कृषी यांच्या खात्यावर लवकरच प्रोत्साहन भत्ता व मानधन जमा करण्यात येईल. शेतकऱ्यांनी गट नैसर्गिक शेतीसाठी याचा काटेकोर वापर करावा - अभयकुमार चव्हाण, प्रकल्प संचालक, कृषी तंत्रज्ञान आत्मा.