Sangli: कुंडल वन अकॅडमीमध्ये ६३ प्रशिक्षणार्थींना विषबाधा, वेळेत उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 16:37 IST2025-02-25T16:36:37+5:302025-02-25T16:37:04+5:30
अन्नाच्या पॅकेटांमुळे त्रास

Sangli: कुंडल वन अकॅडमीमध्ये ६३ प्रशिक्षणार्थींना विषबाधा, वेळेत उपचार मिळाल्याने सर्वांची प्रकृती स्थिर
कुंडल : कुंडल वन अकॅडमीमध्ये बाहेरून आणलेल्या अन्नाच्या पॅकेटमुळे ६३ प्रशिक्षणार्थींना विषबाधा झाली आहे. या अकॅडमीत देशभरातून शासकीय सेवेत रुजू होणारे नवनिर्वाचित उमेदवार प्रशिक्षणासाठी येत असतात. त्याचपद्धतीने महाराष्ट्र दर्शनासाठी चिखलदरा वन प्रशिक्षण येथील ११० जणांच्या फॉरेस्ट गार्डची बॅच भेट देण्यासाठी रविवारी (दि. २३) आली होती. येताना त्यांनी नसरापूर (जि. पुणे) येथून जेवणाची पॅकेट घेतली होती. ही पॅकेट त्यांनी कुंडल येथे आल्यावर म्हणजे साधारण ६ वाजता खाल्ली. नंतर रात्रीचे जेवण कुंडल वन अकॅडमी येथे केले. याचवेळी काहींना त्रास होत होता.
सोमवारी (दि. २४) सकाळी ८:३० वाजता नियमित प्रशिक्षण सुरू झाल्यावर काही प्रशिक्षणार्थी महिलांना त्रास झाल्यावर त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यापैकी ६३ प्रशिक्षणार्थींना अन्नाच्या पॅकेटमुळे पोट बिघडणे, उलटी आणि चक्कर येऊ लागली. यातील कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन, पलूस ग्रामीण रुग्णालयात १७, तर सांगली येथे शासकीय रुग्णालयात ८ प्रशिक्षणार्थी उपचार घेत आहेत. तर बाकीच्या प्रशिक्षणार्थींची किरकोळ उपचारानंतर प्रकृती स्थिर आहे.
सर्व प्रशिक्षणार्थींची प्रकृती स्थिर आहे. बाहेरून आणलेल्या खाद्यपदार्थ आणि उन्हाचा तडाखा यामुळे त्यांना हा त्रास झाला आहे. वेळेत उपचार मिळाल्याने काळजी करण्याचे कोणतेच कारण नाही. - यशवंत बहाडे, संचालक, चिखलदरा वन प्रशिक्षण संस्था.
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त आहे, तर प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय उपचार पुरविले आहेत. पोलीस यंत्रणा शक्य ती मदत करत आहे. - जयसिंग पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, कुंडल पोलिस स्टेशन