‘वसंतदादा’कडे शेतकऱ्यांची ९५ कोटींची थकबाकी
By Admin | Updated: September 16, 2014 22:50 IST2014-09-16T22:50:55+5:302014-09-16T22:50:55+5:30
संजय कोले : शेट्टी, रघुनाथदादांनीही जबाबदारी घ्यावी

‘वसंतदादा’कडे शेतकऱ्यांची ९५ कोटींची थकबाकी
सांगली : वसंतदादा साखर कारखान्याकडे सभासदांच्या ठेवींचे ६१ कोटी आणि शेतकऱ्यांच्या २०१३-१४ गळीत हंगामातील ऊस बिलाची थकबाकी ३४ कोटी रूपयांची आहे़ सुमारे ९५ कोटींची रक्कम सभासद आणि शेतकऱ्यांना २१ एकर जमीन विक्री करून देण्यात यावी, अशी मागणी संजय कोले यांनी केली आहे़ तसेच वसंतदादा कारखान्याला वारंवार संरक्षण देण्याचा प्रयत्न करणारे खासदार राजू शेट्टी, रघुनाथदादा पाटील यांच्यावर शेतकऱ्यांची थकबाकी देण्याची जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले़
ते पुढे म्हणाले की, वसंतदादा साखर कारखान्याने १९९१ पासून ऊसबिलातून शेतकऱ्यांची व्यक्तिगत सहमती न घेताच परतीची ठेव म्हणून रक्कम कपात केली आहे़ ठेवीची मूळ रक्कम आणि व्याज यासह ६१ कोटी रूपये कारखान्याकडे सभासदांची थकबाकी आहे़ ही रक्कम देण्यासाठी कारखाना प्रशासनाने आजपर्यंत कोणतेही प्रयत्न केले नाहीत़ तसेच २०१३-१४ या गळीत हंगामातील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे ३४ कोटी रूपये कारखान्याकडून दिले नाहीत़ कारखान्याकडील २१ एकर जमीन विक्रीतून प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे ९५ कोटी रूपये प्राधान्याने द्यावेत़ त्यानंतर राज्य, जिल्हा बँकेसह अन्य बँकांची थकबाकी द्यावी, अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे़
वसंतदादा कारखान्यात रघुनाथदादा पाटील यांचे संचालक असून खासदार राजू शेट्टी यांचीही कारखाना संचालक मंडळाशी जवळीक आहे़ म्हणून संघटनांच्या दोन्ही नेत्यांनी शेतकऱ्यांची थकित रक्कम देण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणीही कोले यांनी केली आहे़ (प्रतिनिधी)