सांगलीतील मांगले येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात ५० ग्रामस्थ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:26 IST2025-04-29T13:25:38+5:302025-04-29T13:26:17+5:30
मधमाश्यांनी पाठ सोडली नाही

संग्रहित छाया
मांगले (जि. सांगली) : येथील गणेशनगर भागातील एका घरावर असलेल्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ५० हून अधिक ग्रामस्थ जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात ग्रामस्थ, महिला व लहान मुलांचा समावेश आहे.
गावात जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. गणेशनगर येथील मुख्य गल्लीत खुदाई करून पाणी पुरवठ्याची नवीन पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्याला घरगुती पाण्याची कनेक्शन जोडण्याचे काम सुरू होते. पाइप इलेक्ट्रिक मशीनच्या साहाय्याने गरम करून कनेक्शन जोडणी सुरू असताना पाइप गरम करतेवेळी झालेल्या धुरामुळे जवळ असणाऱ्या इमारतीवरील मधाच्या पोळ्यावरील माशा उठल्या.
मधमाश्यांनी पाठ सोडली नाही
सुरुवातीला काम करणाऱ्या कामगारांना मधमाश्यांनी वेढले. कामगारांनी हल्ला होताच पळ काढला. मात्र, मधमाश्यांनी पाठ सोडली नाही. याचवेळी गल्लीत कशाचा दंगा सुरू झाला म्हणून काही ग्रामस्थ, महिला, मुले घरातून बाहेर आली. त्यावेळी मधमाश्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला. रात्री उशिरापर्यंत या गल्लीतून येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना मधमाश्यांनी चावा घेतला. नळ कनेक्शन जोडणारे प्रमुख गजानन नाडे जवळ असल्यामुळे त्यांना जास्त मधमाश्यांनी घेरले होते. त्यांच्या डोक्यात व इतर ठिकाणी मधमाश्यांनी हल्ला केल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते.