५.३३ कोटींचा अपहार; सांगली जिल्हा बँकेचे सात कर्मचारी सेवेमधून बडतर्फ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:06 IST2025-07-31T13:05:30+5:302025-07-31T13:06:32+5:30
निलंबित १८ जणांवर ही लवकरच कारवाई

५.३३ कोटींचा अपहार; सांगली जिल्हा बँकेचे सात कर्मचारी सेवेमधून बडतर्फ
सांगली : जिल्हा बँकेच्या शासकीय निधीसह विविध निधीतील ५ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी शाखा अधिकाऱ्यांसह २५ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. यापैकी सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. तसेच उर्वरित १८ कर्मचाऱ्यांनाही लवकरच बडतर्फ करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या तासगाव, बसरगी, पलूस, नेलकरंजीसह विविध शाखांमध्ये २ कोटी ११ लाख ६० हजार ८२४ रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. बडतर्फ कर्मचाऱ्यांत इंद्रजित विठ्ठल वाघमारे (शाखा : बसरगी), योगेश सुरेश वजरीनकर, प्रमोद सुरेश कुंभार (शाखा मार्केट यार्ड, तासगाव), बाळासो नारायण सावंत (औद्योगिक वसाहत पलूस), प्रतिप गुलाब पवार, मच्छिंद्र गुंडा म्हारगुडे व दिंगबर पोपटी शिंदे (शाखा : नेलकरंजी) यांचा समावेश आहे.
नैसर्गिक आपत्ती व अन्य कारणांसाठी शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई, अनुदान स्वरुपात मदत दिली जाते. जिल्हा बँकेत आठ ते दहा वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांची शासनाकडून आलेल्या मदतीची कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. या रकमेत काही शाखांमध्ये कर्मचाऱ्यांनीच अपहार केल्याच्या घटना वर्षभरात सातत्याने उघडकीस आल्या. हा अपहार चार ते पाच वर्षांपूर्वी झाला आहे. मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सर्वच शाखांची अंतर्गत तपासणी मोहीम सुरु केल्याने हे घोटाळे उघडकीस आले.
आतापर्यंत ५.२२ कोटींचा अपहार
शाखाधिकारी व लिपीक, काही ठिकाणी शिपाई यांनी संगनमताने शेतकऱ्यांच्या मदतीवर डल्ला मारला आहे. काही शाखांमध्ये बँकेच्या देणे व्याजात ही अपहार झाल्याचे आढळले आहे. जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये शासकीय मदत, अनुदान व देणे व्याज यामध्ये पाच कोटी २२ लाख रुपयांचा अपहार आतापर्यंत झाला आहे.
अपहारातील २.९० कोटी शासनाला भरले
जिल्हा बँकेच्या प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून आतापर्यंत २ कोटी ९० लाख रुपये वसूल केले आहेत. शासकीय अपहाराची सर्व रक्कम जिल्हा बँक प्रशासनाने वसूल करुन शासनाकडे परत भरली आहे. अपहार करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यापैकीच सात कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले असून १८ कर्मचाऱ्यांच्या बडतर्फची कारवाई चालू आहे.