प्रताप महाडिककडेगाव : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या चारही टप्प्यांची तसेच मुख्य कालव्यांच्या अस्तरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे २७ हजार ४३० हेक्टर लाभक्षेत्रापैकी आजवर १८ हजार ६३० हेक्टर लाभक्षेत्र ओलिताखाली आले आहे. मात्र, उर्वरित कामे अपूर्ण असल्याने ८ हजार ७९५ हेक्टर क्षेत्र योजनेच्या लाभापासून वंचित आहे. त्यासाठी प्रकल्पाच्या वाट्याचे ९.३४ टीएमसी पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्याची आवश्यकता आहे.ताकारी उपसा सिंचन योजनेसाठी साटपेवाडी (ता. वाळवा) येथे २७८ मीटर लांबीचे बॅरेज (बंधारा) बांधून कृष्णा नदीचे पाणी अडवले आहे. या बॅरेजला १२ बाय ५ मीटरचे ८ गेट आहेत. येथे अडविलेले पाणी लगतच असलेल्या पंपगृह टप्पा क्रमांक १च्या संतुलन जलाशयात जाते. पहिल्या टप्प्यात १७८६ अश्वशक्तीच्या १४ पंपाद्वारे पाणी उचलून तीन ऊर्ध्वगामी वाहिनीद्वारे सागरेश्वर खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील जलाशयात सोडले जाते.
दुसऱ्या टप्प्यातून पुन्हा १७८६ अश्वशक्तीच्या १४ पंपांद्वारे कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे हद्दीत मुख्य कालव्यात पाणी सोडले जाते. दुसऱ्या टप्प्यातील वितरण हौदातून १० किमी लांबीच्या बंदिस्त जलवाहिनीद्वारे वाळवा तालुक्यातील ताकारी व दुधारी येथील ४९४ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी दिले आहे.
देवराष्ट्रे ते सोनी १४४ किमी जलप्रवास..दुसऱ्या टप्प्यातून उचलेले पाणी देवराष्ट्रे हद्दीतून १४४ किमी लांबीच्या मुख्य कालव्यातून कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यांतून प्रवास करीत मिरज तालुक्यातील सोनीपर्यंत २१ हजार ९३६ हेक्टर क्षेत्राला सोडले जाते.
तिसऱ्या टप्प्यातून चिंचणी भरण कालव्यात पाणी..मुख्य कालव्यापासून सात किलोमीटर जवळ मोहित्यांचे वडगाव हद्दीतील पंपगृह टप्पा क्रमांक ३च्या वितरण हौदातही योजनेचे पाणी सोडले आहे. येथे १२५० अश्वशक्तीच्या ३ पंपाद्वारे उचलेले पाणी चिंचणी भरण कालव्यात पाणी सोडले जाते. त्यानंतर ११ किमी लांबीच्या या चिंचणी भरण कालव्यातून योजनेचे पाणी वितरिकांद्वारे आसद, वाजेगाव, चिंचणी, पाडळी, सोनकोरे येथील १४०६ हेक्टर लाभक्षेत्राला दिले आहे. तसेच चिंचणी येथील तलावातही सोडले आहे.
चौथ्या टप्प्यातून सोनसळ शिरसगावला पाणी..चिंचणी भरण कालव्याद्वारे येणारे पाणी थेट सोनसळ कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात सोडले आहे. येथील पंपगृह टप्पा ४ मधून अश्वशक्तीच्या दोन पंपाद्वारे सोनसळ येथील वितरण हौदात सोडले आहे. येथून बंदिस्त पाइपद्वारे सोनसळ व शिरसगाव येथील ५१२ हेक्टर लाभक्षेत्राला दिले आहे.
सोनसळ डावा कालवा..चिंचणी भरण कालव्याला सोनसळच्या बंधाऱ्याच्या जवळच डावा कालवा जोडला आहे. २३ किमी लांबीच्या या कालव्यातून सोनकिरे, चिंचणी, तडसर आणि हिंगणगाव खुर्द येथील ३०८२ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी दिले आहे.
तालुकानिहाय लाभक्षेत्र हेक्टरमध्येकडेगाव : ११८२१खानापूर : ४१०२पलूस : १५७६तासगाव : ९०५६मिरज : ३८१वाळवा : ४९४असे सहा तालुक्यांतील ७१ गावांचे एकूण लाभक्षेत्र २७ हजार ४३० हेक्टर आहे.