बँकांमध्ये १७६ कोटी पडून, सांगली जिल्ह्यात ३९ लाखाचे मालक सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:33 IST2025-10-25T19:32:53+5:302025-10-25T19:33:04+5:30
खातेदारांच्या चेहऱ्यावर आनंद

बँकांमध्ये १७६ कोटी पडून, सांगली जिल्ह्यात ३९ लाखाचे मालक सापडले
सांगली : विविध बँकांमध्ये खातेदारांच्या दहा वर्षांपासून दावा न केलेल्या रकमेची परतफेड करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विशेष मोहीम राबविली आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ३३४ खातेदारांना एकूण ३८ लाख ९९ हजार रुपये परत करण्यात आले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या उपक्रमामुळे पैसे मिळालेल्या खातेदारांनी आनंद व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये दावा न केलेली रक्कम सुमारे १७६ कोटी रुपये असून, सात लाख ७५ हजार ३१५ खातेदारांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी शुक्रवारी जिल्हा अग्रणी कार्यालय, बँक ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा बँकेत मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक काकडे, बँक ऑफ इंडियाचे कोल्हापूर विभागाचे उपआंचलिक प्रबंधक विशालकुमार सिंह, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ, जिल्हा अग्रणी प्रबंधक विश्वास वेताळ, एलआयसी सातारा विभागाच्या मॅनेजर संगीता हिंगमिरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, जिल्ह्यातील दावा न केलेल्या रकमेची खातेदारांना परतफेड होणे हे उपक्रम संबंधितांसाठी चांगलेच साहाय्य ठरेल. प्राप्त रकमेचा योग्य उपयोग करावा आणि गुंतवणूक करावी, असे त्यांनी आवाहन केले. तसेच तालुकास्तरावर व गावागावात या उपक्रमाची माहिती पोहोचवण्यासाठी विविध उपाययोजना कराव्यात, बँकांनी व्हॉट्सऍप, एसएमएस व अन्य माध्यमांतून खातेदारांना संबंधित माहिती द्यावी. आपला हक्काचा पैसा मिळवण्यासाठी खातेदारांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित बँकेशी संपर्क साधावा, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते विविध खातेदारांना दावा न केलेल्या रकमेचे प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश प्रदान करण्यात आला.
पैसे मागणीसाठी तीन महिन्यांची मुदत :
रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार, जर खातेदाराने बचत, चालू किंवा मुदत ठेव अशा खात्यावर दहा वर्षांत कुठलाही व्यवहार केला नसेल, तर ती रक्कम संबंधित बँक आरबीआयकडे जमा करेल. अशी रक्कम मागण्याचा अधिकार खातेदार किंवा मयत खातेदाराच्या वारसाला आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने खातेदारांना संबंधित बँकेशी संपर्क करून रक्कम मागण्यास तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.