नियोजनसाठी १०० टक्के मतदान
By Admin | Updated: July 31, 2014 00:06 IST2014-07-31T00:03:36+5:302014-07-31T00:06:23+5:30
आज मतमोजणी : अकराजणांचे भवितव्य ठरणार

नियोजनसाठी १०० टक्के मतदान
सांगली : जिल्हा नियोजन समिती सदस्य पदासाठीच्या पाच जागांसाठी आज, बुधवारी मतदान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मतदान प्रक्रियेत महानगरपालिकेच्या ७८ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. उद्या गुरुवार, ३१ रोजी सकाळी १० वाजता अल्पबचत सभागृहात मतमोजणी होणार आहे.
जिल्हा नियोजन समितीत महानगरपालिकेचे पाच सदस्य आहेत. या सदस्यांच्या निवडीसाठी २१ जणांनी अर्ज भरले होते. परंतु अर्ज माघार घेण्याच्यादिवशी १० जणांनी माघार घेतल्याने ११ उमेदवार रिंगणात राहिले. यामध्ये कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी पाच, तर स्वाभिमानीच्या एका सदस्याचा अर्ज कायम राहिला. दरम्यान, महानगरपालिकेच्या ७८ नगरसेवकांनी आज मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादीचे महेंद्र सावंत, आशा शिंदे, राजू गवळी, प्रियांका बंडगर, स्रेहल सावंत, कॉँग्रेसचे हारुण शिकलगार, बबिता मेंढे, किशोर लाटणे, मृणाल पाटील आणि अश्विनी कांबळे, तर स्वाभिमानीचे जगन्नाथ ठोकळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान हे नगरसेवकांनी त्यांच्या पसंतीक्रमाने केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार पवार यांनी काम पाहिले.
उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी होणार असून, अकरा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)