Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:22 IST2025-09-01T15:20:02+5:302025-09-01T15:22:22+5:30
गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत.

Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग
मुंबई : गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत. दागिन्यांतील, साड्यांतील वैविध्यता, तसेच फराळातील पारंपरिक निराळेपण आणि जागरणांचा खेळ या साऱ्यांचा समावेश असल्याने गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवातील चैतन्य द्विगुणित झाले आहे. 'आली गौराई अंगणी, तिचे लिंबलोण करा,' असे म्हणत सगळे तिच्या सेवेत गुंतले आहेत. भाद्रपद शुद्ध सप्तमीच्या अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आवाहन करण्यात येते. त्यानुसार सायंकाळी ५:२५ च्या मुहूर्तापर्यंत ज्येष्ठ-कनिष्ठ गौरीचे स्वागत घरोघरी झाले आहे. त्यानंतर सोमवारी गौरी पूजन, तर मंगळवारी विसर्जन होणार आहे.
गौराईच्या पूजेसाठी सोनकी, ताग, शेवंती, करवीर, जुई, जाई, भोपळ्याचे फूल, केवड्याचे पान-फूल, तेरडा, सुपारी, आघाडा, तुळशीपत्राला विशेष मागणी असते. गौराईच्या सजावटीत आणि पूजेत कृत्रिम वस्तूंपेक्षा रानफुलांची सुगंधी आरास केली जाते. त्यामुळे रानफुलांना आणि रानभाज्यांनाही मागणी या दिवसांत वाढते, अशी माहिती जाणकारांनी दिली.
१६ भाज्या, कोशिंबीर, वडे, मिठाई
- गौराई म्हणजे गणपतीची आई. ती माहेरी १ आल्याने तिच्या आगमनापासून विविध फराळ तिच्यासाठी तयार केले जातात. यामध्ये पिठाच्या करंजीपासून ते तिळाचे लाडू, मोदक, बेसन लाडू यांचा समावेश असतो. यामध्ये कमीत कमी १५ ते १६ मिठाई, गोडपदार्थ ठेवण्याची मान्यता आहे.
- नैवेद्यासाठी पुरणपोळी, खिरी या 3 मिष्ठान्नाला प्राधान्य दिले जाते. गौरीपूजनाच्या दिवशी विविध ठिकाणी विविध पारंपरिक नैवेद्य दाखवले जात असून, यामध्ये वड्यांपासून पिठलं-भाकरी, सोळा भाज्यांची मिक्स भाजी, धोंडस अशा पदार्थांचा समावेश असतो.
-गौरीला विसर्जनाच्या दिवशी दही-भाताचा ३ घास आवर्जून भरवला जातो. तिसऱ्या दिवशी विसर्जनावेळी हळदी-कुंकू, सुकामेवा, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल अशा वस्तू सुतात गुंडाळून गाठी घेण्याची प्रथा आहे.
ओवशाची प्रथा
गौरी पूजनातील एक महत्त्वाची प्रथा म्हणजे ओवसा. कोकणात खास करून ही परंपरा आजही जपली जाते. नववधूसाठी पहिला ओवसा फार महत्त्वाचा असतो. सुवासिनी गौरीला ओवसायला येतात. सोन्याचे मणिमंगळसूत्र, चांदीची जोडवी, खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, पाच प्रकारची फळे, पाच प्रकारच्या मिठाई, पाच भोपळ्याची पाने आदी वस्तूंनी नवीन सूप सजवून सुवासिनी गौरीभोवती पाच वेळा ओवाळतात. ते सूप गौरी पुढे ठेवतात आणि आशीर्वाद घेतात.