Rose Day : जर समजून घेतला नाही गुलाबाच्या रंगांचा अर्थ; तर घडेल अनर्थ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 11:07 IST2020-02-07T11:06:00+5:302020-02-07T11:07:03+5:30
फार जास्त काही न बोलता समोरच्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सर्वात चांगली आणि सोपी पद्धत आहे.

Rose Day : जर समजून घेतला नाही गुलाबाच्या रंगांचा अर्थ; तर घडेल अनर्थ!
(Image Credit : telegraph.co.uk)
आजपासून म्हणजेच रोज डे पासून व्हॅलेंटाइन वीकला सुरूवात झाली आहे. येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाईल. आजच्या दिवशी फुलं देऊन प्रेम व्यक्त करतात. फार जास्त काही न बोलता समोरच्या व्यक्तीसमोर आपल्या भावना व्यक्त करण्याची ही सर्वात चांगली आणि सोपी पद्धत आहे. पण अनेकांना कोणत्या रंगाच्या गुलाबाचा काय अर्थ असतो हेच माहीत नसतं. त्यामुळे अनेकांची पंचाईत होते. त्यामुळे आम्ही तुमचं हे कोडं सोडवणार आहोत.
लाल गुलाब (red rose)
हा गुलाबाच्या फुलाचा प्रेम दर्शवणारा सर्वात कॉमन रंग आहे. लाल गुलाब हा रोमान्स, पॅशन आणि इंटेन्स इमोशनशी संबंधित मानला जातो. हा गुलाब देऊन तुम्ही समोरच्या व्यक्तीकडे हे व्यक्त करता की, तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम आहे. म्हणजे हा लाल गुलाब आय लव्ह यू म्हणण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे.
पिवळा गुलाब (yellow rose)
पिवळा गुलाब हा मैत्रीसाठी वापरला जातो. कारण पिवळा रंग हा जोशपूर्ण, तजेलदार आणि उत्साह देणारा मानला जातो. सोबतच पिवळा रंग हा आनंद आणि चांगल्या आरोग्याचा प्रतिकही मानला जातो. म्हणजे तुम्हाला जर मित्रांना किंवा मैत्रिणींना सांगायचंय की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, तर त्यांना तुम्ही पिवळा गुलाब देऊ शकता.
पांढरा गुलाब (white rose)
जर तुमचं तुमच्या एखाद्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी एखाद्या कारणावरून जोरदार भांडण झालं असेल. पण आता हे भांडण विसरून तुम्हाला पुन्हा नातं जोडायचं असेल तर पांढऱ्या रंगाचा गुलाबा चांगला पर्याय आहे. पांढरा गुलाब हा साधेपणा, विनम्रता, शांती आणि मनातील चांगल्या गोष्टीचा प्रतिक मानला जातो.
पिंक गुलाब (pink rose)
पिंक गुलाब हा समोरच्या व्यक्तीप्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. व्हॅलेंटाइन डे हा केवळ पार्टनरसोबत प्रेम करण्यासाठी नसतो. तुम्ही आई, वडील, शिक्षक, भाऊ, बहीण, मित्र यांच्या विषयीही प्रेम व्यक्त करू शकता. त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी तुम्ही त्यांना पिंक गुलाब देऊ शकता.
लॅवेंडर गुलाब (lavender rose)
जर तुम्हाला Love at first site झालं असेल तर तुम्ही लॅवेंडर रंगाचा गुलाब समोरच्या व्यक्तीला देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. खरंतर लॅवेंडर रंगाचा गुलाब सहजपणे मिळत नाही आणि या रंगाचा गुलाब शोधण्यासाठी तुम्हाला फारच मेहनत घ्यावी लागू शकते.