Chocolate Day: चॉकलेटची 'कडू' कहाणी; एकेकाळी होतं डुकरांचं पेय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2018 13:45 IST2018-02-09T13:44:08+5:302018-02-09T13:45:12+5:30
चॉकलेचा वापर इतर पदार्थांमध्ये कडू आणि तिखट चव आणण्यासाठी केला जायचा.

Chocolate Day: चॉकलेटची 'कडू' कहाणी; एकेकाळी होतं डुकरांचं पेय
मुंबई: सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन वीकचे वातावरण असल्याने तरुणाईकडून प्रत्येक दिवस उत्साहाने साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अनेकजण व्हॅलेंटाईन वीकमधील प्रत्येक दिवसाचा इतिहास आणि माहात्म्य जाणून घेण्यास उत्सुक असतात. जेणेकरून आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट किंवा सरप्राईज देता येईल, असा त्यांचा विचार असतो. आज 'चॉकलेट डे'च्या दिवशीही तरुणाईचा उत्साह असाच ओसंडून वाहत आहे.
यानिमित्ताने चॉकलेटचा शोध आणि उगम याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या ओघात चॉकलेटविषयीच्या अनेक रंजक कथा समोर येताना दिसत आहेत. चॉकलेटचा शोध साधारण 4000 वर्षांपूर्वी मेक्सिकोमध्ये लागला. सुरुवातीच्या काळात चॉकलेटची चव पूर्णपणे कडू होती. या गुणांमुळे चॉकलेचा वापर इतर पदार्थांमध्ये कडू आणि तिखट चव आणण्यासाठी केला जायचा. इतकेच नव्हे तर चॉकलेटची ओळख ही डुकरांना देण्यासाठीचे पेय म्हणून होती. त्यामुळे चॉकलेट हे फक्त स्पेन या देशापुरतेच मर्यादित होते. मात्र, 17 व्या शतकात स्पेनच्या राजकुमारीचा फ्रान्सच्या राजाशी विवाह झाला. त्यानंतर स्पेन आणि फ्रान्समधून चॉकलेटचा प्रसार संपूर्ण युरोप खंडात झाला. या काळात चॉकलेटची चव गोड झाली.
14 व्या शतकात एज्टेक संस्कृतीचे प्रस्थ वाढायला लागले. हे लोक माया जमातीच्या लोकांशी व्यवहार करताना चलन म्हणून कोको बीन्सचा वापर करायचे. त्यामुळे माया लोकांसाठी कोकोला एकप्रकारचे वरदान मानत. त्यामुळे चॉकलेट हे राज्यकर्ते, क्षत्रिय, पुजारी आणि उच्चवर्णीय लोकांपुरते मर्यादित होते.