नातं कायमचं संपवण्याआधी हे 3 प्रश्न एकदा स्वत:ला विचाराच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 16:52 IST2018-05-02T16:18:43+5:302018-05-02T16:52:32+5:30
काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...

नातं कायमचं संपवण्याआधी हे 3 प्रश्न एकदा स्वत:ला विचाराच!
मुंबई : एकत्र आलेले दोन व्यक्ती कधीही एकसारख्या नसतात. त्यांचे विचार, त्यांचे स्वभाव हे वेगळे असतात. काही सतत विनाकारण भांडणं उखरुन काढतात. तर काही कपल्स हे ऐकमेकांशी सगळंच शेअर करतात. काही काहीच बोलत नाहीत. काही नेहमी सोबत असतात तर काही भेटू शकत नाहीत. अशात काही कपल्स हे सततच्या भांडणाला, विचित्र वागण्याला किंवा मनासारखं न होण्याला कंटाळून आपलं नातं नेहमीसाठी संपवण्याचा विचार करतात. अशावेळी नातं असं एकाएकी संपवण्याआधी स्वत:ला काही प्रश्न नक्कीच विचारा...
1) तुम्ही दु:खी आणि रागात आहात का?
अनेकदा काही गोष्टींवरुन भांडणं होणं ही कोणत्याही नात्यात साधारण बाब आहे. अनेकदा रागाच्या भरात तुम्ही जे बोलायचं नसतं ते बोलून जाता. नंतर त्याचा पश्चाताप करता. अशावेेळी रागात झालेल्या गोष्टींमुळे अनेक वर्षांचं नातं एकाएकी तोडणं कधीही शहाणपणाचं ठरणार नाही. आधी शांत व्हा, ती वेळ निघून जाऊ द्या. शांतपणे नात्याचा विचार करा आणि मग काय तो निर्णय घ्या. याचा विचार करा कि, तुम्हाला खरंच नातं संपवायचंय की, रागात तुम्ही बोलून गेलात. कारण रागाच्या भरात एकदा घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो.
2) तुमच्या पार्टनरला नातं टिकवायचं आहे?
कोणतही नातं हे एका गाडीच्या दोन चाकांप्रमाणे असतं. एक जरी चाक मोडलं गेलं तर गाडी पुढे जाणार नाही. दोघांमुळेच नातं तयार होत असतं. कदाचित तुम्ही शांत झाल्यावर दोघांमध्ये असलेली समस्या तुम्हाला सोडवायची असेल पण विचार करत असाल की, अनेक अडचणी आहेत. अशात जर तुमच्या पार्टनरलाही हे नातं टिकवायचं असेल तर ही एक नवी संधी समजा. दोघेही या संधीचा वापर तुमच्या नात्याचं भविष्य ठरवण्यासाठी करा. एकमेकांनी हे नातं का टिकवावं याचं निदान एक योग्य कारण द्या.
3) हे नातं सांभाळून घेण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न केलाय का?
काही कारणांनी ठराविक वेळी नातं तोडण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा तुम्हाला पश्चाताप होऊ नये हे महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्ही स्वत:ला प्रश्न विचारा की, तुम्ही हे नातं वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी सर्व प्रयत्न केलेत का? जर तुम्हाला वाटत असेल की, हे नातं टिकवण्यासाठी तुमचे सगळे प्रयत्न करुन झाले आहेत आणि आता करण्यासाठी काहीही राहिलं नाही तर तुम्ही मोकळे आहात. पण मनात हे नातं वाचवण्यासाठीची एकही शक्यता दिसत असेल तर ते करुन बघा. विषय सहज सोडून देऊ नका.