घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 10:10 IST2025-12-21T10:10:24+5:302025-12-21T10:10:50+5:30
भारतात मध्यमवर्गीयांसाठी घर खरेदी करणे आता स्वप्नच उरले आहे का? पगार वाढूनही मालमत्तेच्या किमती का नडत आहेत? वाचा रिअल इस्टेटमधील वाढती महागाई आणि उत्पन्नातील तफावत यावर विशेष रिपोर्ट.

घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
नवी दिल्ली: भारतीय मध्यमवर्गीयांचे सर्वात मोठे स्वप्न म्हणजे स्वतःचे हक्काचे घर. मात्र, गेल्या काही दशकांत बदललेली आर्थिक परिस्थिती आणि गगनाला भिडलेली महागाई यामुळे हे स्वप्न पूर्ण करणे आता पूर्वीपेक्षा जास्त आव्हानात्मक झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, लोकांचे पगार वाढूनही त्यांना घर खरेदी करताना अडचणी येत आहेत.
आकडेवारीनुसार, १९९० मध्ये असणारा ३,५०० रुपयांचा पगार आजच्या २७,००० ते ३०,००० रुपयांच्या बरोबरीचा आहे. ६% महागाई दर गृहीत धरल्यास, लोकांच्या पगारात वाढ झाली असली तरी त्यांची 'खरेदी करण्याची क्षमता' मात्र १९९० च्या पातळीवरच अडकून पडली आहे.
रिअल इस्टेटमधील दरवाढ पगाराच्या तुलनेत दुप्पट
तज्ज्ञांच्या मते, मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नात वर्षाला साधारण ४-५% वाढ होत आहे. याउलट, मेट्रो शहरांमध्ये घरांच्या किमतीत दरवर्षी १०-११% वाढ होत आहे. म्हणजेच, मालमत्तेच्या किमती ज्या वेगाने वाढत आहेत, त्या वेगाने सामान्यांचे उत्पन्न वाढत नाहीये. सोने, शेअर्स आणि जमीन यांसारख्या मालमत्तांच्या किमतीत होणारी ही मोठी वाढ मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी राहिलेली नाही.
कर्जबाजारीपणा आणि वाढती मागणी २००८ नंतर जागतिक अर्थव्यवस्थेत झालेल्या बदलांमुळे कर्ज मिळणे सोपे झाले. यामुळे बाजारात कर्ज घेऊन गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली. परिणामी, घरांच्या किमती कृत्रिमरीत्या वाढल्या आहेत. मेट्रो शहरांमध्ये तर हे अंतर इतके वाढले आहे की, मध्यमवर्गीयांना आता घरासाठी शहराबाहेरच्या परिसराचा विचार करावा लागत आहे.