Workers killed on the spot by freight tempo | मालवाहू टेम्पो कलंडून कामगार जागीच ठार

मालवाहू टेम्पो कलंडून कामगार जागीच ठार

ठळक मुद्देमालवाहू टेम्पो कलंडून कामगार जागीच ठारगाडीतील खोके अंगावर पडल्याने मृत्यू

खेड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडच्या बाजूने येणारा मालवाहू टेम्पो कलंडून झालेल्या अपघातात कामगाराचा जागीच मृत्यू झाला. बन्सीकुमार छुनीलाल कुमावत (वय ५०, रा. पनवेल) असे मृत कामगाराचे नाव असून, गाडीतील टाईल्सचे खोके अंगावर पडून त्याचा दुर्दैव्यारित्या मृत्यू झाला. हा अपघात कशेडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत कशेडी घाटात शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडला.

कशेडी वाहतूक पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक उपनिरीक्षक बोडकर यांनी या अपघाताबद्दल अधिकृत माहिती दिली. मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरून चालक सुधाकर मोतीराम हगनुरे (वय २७, रा. पनवेल) हा आयशर टेम्पो (एमएच ०४, डीएस २३१७)मधून टाईल्सचे खोके घेऊन पनवेल ते गुहागर असा जात होता. टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्यावर उजव्या बाजूला पलटी होऊन अपघात घडला. 

टेम्पोमध्ये टाईल्सचे खोके मोठ्या प्रमाणात होते. या टाईल्सच्या खोक्यांखाली गाडीमध्ये बसलेला कामगार बन्सीकुमार छुनीलाल कुमावत चिरडला. तसेच या टेम्पोतील दुसरा कामगार मुकेश कुमावत (वय ४०, रा. पनवेल) याला दुखापत झाली आहे. त्याला तत्काळ कळंबणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

मुकेशची प्रकृतीही गंभीर असल्याने त्याला पुढील उपचाराकरिता रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघातग्रस्त टेम्पो क्रेनच्या सहाय्याने रस्त्याबाहेर काढण्यात आला. तोपर्यंत वाहतुकीवर परिणाम झाला होता. कशेडी पोलिसांनी आधी एक बाजू मोकळी करून वाहनांचा मार्ग खुला करून दिला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Workers killed on the spot by freight tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.