पूरमुक्तीसाठी युद्धपातळीवर काम, शिवनदीतील गाळ काढताना ‘नाम’चा पोकलेन कलंडला नदीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 14:02 IST2022-02-28T14:00:26+5:302022-02-28T14:02:43+5:30
शहरवासियांना पुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी नाम फाऊंडेशनकडून युद्धपातळीवर काम

पूरमुक्तीसाठी युद्धपातळीवर काम, शिवनदीतील गाळ काढताना ‘नाम’चा पोकलेन कलंडला नदीत
चिपळूण : शहरवासियांना पुरापासून मुक्ती मिळावी, यासाठी युद्धपातळीवर काम करणाऱ्या नाम फाऊंडेशनकडून शिवनदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरु असतानाच एक पोकलेन नदीपात्रात कलंडला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
आतापर्यंत नाम फाउंडेशनतर्फे ५० टक्के गाळ काढण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यंत्रणेतील कर्मचारीही दिवसरात्र राबत असून आपला जीव धोक्यात घालून पावसाळ्यापूर्वी ते काम मार्गी लावण्यासाठी झटत आहेत. सद्यस्थितीत नाम फाऊंडेशनतर्फे वाशिष्ठी व शिवनदीत गाळ उपसा करण्याचे काम एकाच वेळी सुरु आहे. त्यासाठी चार पोकलेन, पाच डंपर व जेसीबी अशी यंत्रणा कार्यरत आहे.
येथील महर्षी कर्वे भाजी मंडईच्या मागील बाजूस खाटीक आळी परिसरातील शिवनदीत रविवार दुपारी गाळ काढण्याचे काम सुरू होते. अशातच एक पोकलेन नदी काठावरून थेट पात्रात कोसळला. त्याठिकाणी पाणीही खूप होते. त्यामध्ये अर्धा पोकलेन बुडाला. सुदैवाने चालक तितक्याच तत्परतेने केबीनमधून बाहेर पडला. त्यानंतर अन्य दोन पोकलेनच्या सहाय्याने पाण्यात बुडालेली पोकलेन बाहेर काढण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच नाम फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना मदत केली. त्यानंतर तासाभराने पुन्हा कामाला सुरूवात केली.