रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदर विकासाच्या कामाचा आठवडाभरात शुभारंभ, ११३ कोटींच्या निधीला मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 15:45 IST2025-07-21T15:45:23+5:302025-07-21T15:45:59+5:30
अतिक्रमणे हटविल्यानंतर बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे

संग्रहित छाया
रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा बंदर टप्पा २ अंतर्गत विकास करण्यासाठी शासनाकडून ११३ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता यापूर्वीच देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी २२ काेटींचा निधी उपलब्ध आहे. या कामांचे भूमिपूजन आठवडाभरात करण्यात येणार असल्याचे मत्स्य व बंदर विकासमंत्री नीतेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात सांगितले. त्यामुळे लवकरच या बंदराचा कायापालट झालेला पाहायला मिळणार आहे. २२ कोटींची कामे दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहेत.
मिरकरवाडा बंदराच्या २५ हेक्टर जागेवर गेली कित्येक वर्षे अनधिकृत बांधकामे होती. त्यामुळे बंदराचा विकास गेली कित्येक वर्षे रखडला होता. मंत्री नीतेश राणे यांनी रत्नागिरी दौरा केल्यानंतर वस्तुस्थिती पाहून वर्षानुवर्षे शासकीय जमिनीवर अतिक्रमण केलेली सर्व बांधकामे त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या. ही अतिक्रमणे हटविल्यानंतर बंदराच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बंदराच्या विकासासाठी दुसऱ्या टप्प्यातील निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आठवडाभरात पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या उपस्थितीत २२ कोटी निधीच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे मंत्री नीतेश राणे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे लवकरच मिरकरवाडा बंदराचे रुपडे पालटलेले पाहायला मिळणार आहे.
यापूर्वी मिरकरवाडा टप्पा १ मध्ये ७४ कोटी रुपये मंजूर झाले होते. यामध्ये मत्स्य बंदराच्या पश्चिमेकडील अस्तित्वात असलेल्या १५० मीटर लांबीच्या ब्रेकवॉटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उत्तरेकडील ६७५ मीटर लांबीच्या नवीन ब्रेकवॉटरचे काम पूर्ण झाले. त्यानंतर आता टप्पा २ साठी ११३ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
दुसऱ्या टप्प्यात ही कामे
१५० मीटरची लाटरोधक भिंत बांधणे, नौकांच्या मार्गातील गाळ काढणे, लिलाव गृह, जाळे विणण्याच्या शेड, निवारा शेड, धक्का व जेटी दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, वर्कशॉप बांधणे, प्रशासकीय इमारत, उपाहार गृह, रेडियो कम्युनिकेशन सेंटर, प्रसाधन गृह, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे गार्ड रूम बांधणे, आग प्रतिबंधक उपाययोजना आदी कामांचा यामध्ये समावेश आहे.