शोभना कांबळेरत्नागिरी : सध्या शहरांमध्ये अनेक गो पालकांनीच जनावरांना सोडून दिल्याने शहरभर ही मुकी जनावरे दिवसरात्र फिरत असतात. एरव्ही या मुक्या जनावरांचा त्रास सहन न झाल्याने अनेक नागरिक त्यांना हाकलून देत असतात. मात्र, मातृहृदयी महिला आणि आशासेविका यांच्या मदतीमुळे अशाच एका भटक्या गाईने भर पावसात वासराला जन्म दिला. शहरातील एसटी काॅलनी येथे बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एवढेच नव्हे तर या काॅलनीतच तिच्या वासरासह रहाण्याची सोयही त्यांनी केली.शहरातील माळनाका येथील एस. टी काॅलनीतील चाळ क्रमांक ३ च्या मागे दुपारी पाऊण वाजण्याच्या सुमारास एक गोमाता येथील रहिवाशी माधवी डोर्लेकर यांच्या दाराशी आली. त्यांनी तिला खाणे देऊ केले. मात्र, ती प्रसुतीच्या वेदनेने व्याकुळ झालेली त्यांना दिसली. त्यांनी रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात कामाला असलेल्या वंदना गोरे यांना याची कल्पना देताच त्या तातडीने आल्या. त्यांनी कुशलतेने गाईची प्रसूती केली. यावेळी या काॅलनीत रहाणाऱ्या आशा सेविका अरुणा आखाडे या कामावर जात असताना, त्याही तिथेच थांबल्या. पाऊस सुरू होता. त्यामुळे गाई आणि नवजात वासराची सुरक्षितता महत्त्वाची होती.आखाडे यांनी त्या परिसरातील अनेकांकडे ही गाय कुणाची म्हणून विचारणाही केली. मात्र, गाईच्या मालकाचा शोध लागला नाही. अखेर त्यांनी तातडीने नगर परिषदेत फोन करून गाईची व्यवस्था करण्यासंदर्भात विनंती केली. थोड्या वेळाने नगर परिषदेचे शैलेश कदम आणि ऋषिकेश शेलार हे दोन कर्मचारी दाखल झाले. अरुणा आखाडे, माधवी डोर्लेकर आणि कल्पना कुरतडकर यांच्यासह हे दोन कर्मचारी दुपारपर्यंत तिथेच होते. त्या गाईच्या डोळ्यात त्या महिलांबद्दलची कृतज्ञता दिसत होती.खोलीमध्ये मिळाला आसरागाईने नुकताच वासराला जन्म दिल्याने ती वासराला कुणाला हात लावू देणार नाही, असे काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. अखेर या लेकुरवाळ्या महिलांनी गोमातेचे वात्सल्य समजून घेतले आणि तिला आपल्या शेजारी असलेल्या एका खोलीत आसरा देण्याचा निर्णय घेतला. दाेन दिवसांनंतर गाई व तिच्या वासराला शहरानजीकच्या चंपक मैदान येथील गोठ्यात हलविणार असल्याचे नगर परिषदेने सांगितले.
रत्नागिरीत भरपावसात वासराला जन्म देणाऱ्या गोमातेच्या मदतीला धावल्या महिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:14 IST