चिपळूणच्या हायटेक बसस्थानकावर स्लॅबऐवजी बसणार पत्रे?, निधी वाढवून मिळत नसल्याने आराखड्यात बदल होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 18:55 IST2025-12-10T18:55:04+5:302025-12-10T18:55:21+5:30
प्रवाशांना आणखी काही काळ हालअपेष्टा सहन कराव्या लागणार

चिपळूणच्या हायटेक बसस्थानकावर स्लॅबऐवजी बसणार पत्रे?, निधी वाढवून मिळत नसल्याने आराखड्यात बदल होणार
चिपळूण : कधी निधीचा प्रश्न तर कधी ठेकेदाराची दिरंगाई, यामुळे तब्बल सात वर्षे उलटूनही येथील बसस्थानक इमारतीच्या कामाला गती आलेली नाही. कोकणातील मध्यवर्ती व चोवीस तास सेवा देणाऱ्या या इमारतीच्या मूळ आराखड्यात आता बदल करण्यात आला असून, स्लॅबऐवजी पत्रा शेड टाकण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. त्याप्रमाणे नवीन डिझाइन उपलब्ध होताच हे काम तातडीने हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना आणखी काही काळ हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.
जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी, लांजा या तीन प्रमुख बसस्थानकांचे काम सन २०१८ पासून सुरू आहे. यातील रत्नागिरी बसस्थानकाचे काम पूर्णत्वास गेले असले तरी उर्वरित बसस्थानकांचे काम रखडले आहे. येथील इमारतीच्या पायथ्याचे काम पूर्ण केल्यानंतर ते ४ वर्षे काम तसेच पडून होते. त्यातील लोखंड गंजल्याने मूळ बांधकामाला धोका निर्माण झाल्याची ओरड सुरू होती. अशातच पुन्हा हे काम सुरू करण्यात आले.
चिपळूणच्या हायटेक बसस्थानकाच्या कामासाठी सलग दोन ठेकेदार बदलल्यानंतर तिसऱ्या ठेकेदाराकडे हे काम देण्यात आले. त्यानेही पोटठेकेदाराकडे ही जबाबदारी सोपवल्यानंतर महिनाभरापूर्वी या कामाला पुन्हा जोमाने सुरुवात झाली. मात्र, आता या इमारतीच्या रचनेतच बदल करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. या दुमजली इमारतीत नियंत्रण कक्षासह हायटेक पद्धतीच्या सुविधा देण्यात येणार होत्या. मात्र, आता दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब रद्द करून त्याऐवजी पत्राशेड उभारण्याचा प्रस्ताव एसटी महामंडळाच्या अभियंता विभागाने ठेवला आहे.
या कामासाठी २०१६-१७ च्या दरानुसार सुमारे २ कोटी ९० लाख इतका निधी मंजूर आहे. मात्र, आता दरवाढीमुळे या निधीत हे काम पूर्ण होणार नसल्याने व वाढीव निधीची मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने अखेर आराखड्यात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चिपळूण बसस्थानकाच्या इमारतीसाठी मंजूर निधी जुन्या दरानुसार असल्याने आता दरवाढीमुळे त्या निधीत काम पूर्ण होणे अशक्य झाले आहे. वाढीव निधीसाठी प्रयत्न करूनही तो उपलब्ध होत नसल्याने त्यावर पर्याय म्हणून आराखड्यात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे काम थांबले आहे. मंजुरी मिळताच या कामाला सुरुवात केली जाणार आहे. - बालाजी कांबळे, उपअभियंता एसटी महामंडळ
चिपळूण बसस्थानकाचे काम रखडल्यामुळे अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या असून, अनेकदा प्रवाशांचे हाल होत आहेत. काहीवेळा वादाचे प्रसंग उद्भवतात. आठ वर्षे हे काम रखडल्यामुळे बसस्थानकात बैठक व्यवस्था व अन्य समस्या निर्माण झाल्या आहेत. - दीपक चव्हाण, आगार व्यवस्थापक, चिपळूण.