इंजिनिअर होण्याचं त्याचं स्वप्न अर्धच राहणार?
By Admin | Updated: July 4, 2014 00:12 IST2014-07-04T00:06:19+5:302014-07-04T00:12:27+5:30
लमाण समाजातील गणेश राठोड दहावीत ८८ टक्के

इंजिनिअर होण्याचं त्याचं स्वप्न अर्धच राहणार?
शोभना कांबळे- रत्नागिरी
लाभाचा गैरवापर करणारा एखादा सापडला की, कायद्याच्या कक्षा अधिक कडक होतात, त्याचा फटका मग जो खरच गरजू असतो अशांना बसतो. लमाण समाजातील गणेश राठोड हा अशाच गरजूंपैकी एक. दहावीत ८८ टक्के गुण मिळवूनही त्याचं इंजिनीअर होण्याचं स्वप्न काहीसं धुसर होऊ लागलंय. मूळचे उस्मानाबाद येथील रहिवासी असलेले गणेशचे वडील गेली २५ वर्षे रत्नागिरीत राहताहेत. मात्र, निरक्षर असल्यानं कुठलीच कागदपत्रे त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे गणेशला जातीचा दाखला मिळणं अवघड झालंय आणि त्याचा एकूणच फटका त्याच्या करिअरच्या स्वप्नांना बसणार आहे.
गणेशने येथील पटवर्धन प्रशालेत शिकत असताना यावर्षी दहावीला ८८ टक्के गुण मिळवले आहेत. अर्थात तेही कुठलीही खासगी शिकवणी नसताना. रेणुका नववीत ७८ टक्के मार्क मिळवून आता दहावीत गेलीय. ज्यांना सुखवस्तू घर असतं, सगळ्या सोयीसुविधा हाताशी असतात, अशा मुलांना खासगी शिकवण्या लावूनही हे यश मिळत नाही. पण, लमाण समाजातील या मुलांनी अतिशय कष्टानं ते मिळवून दाखवलंय.
गणेशची खूप मनापासूनची इच्छा आहे इंजिनीअर होण्याची. म्हणून त्यानं दहावीनंतर पॉलिटेक्निकला प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. पण, इथंच त्याचं दुर्दैव आडवं आलंय. त्यासाठी आवश्यक असलेला जातीचा पुरावा मोतीराम यांना उस्मानाबाद येथून आणावा लागणार आहे. मोतीराम यांचे आता कुणीच नातेवाईक उस्मानाबादला नाहीत. पूर्वी जातीचे दाखले दुसऱ्या जिल्ह्यात मिळत होते. अगदी २0१२पर्यंत ही पद्धत अमलात येत होती. पण, त्याचा दुरूपयोग झाल्याचे निदर्शनास आल्याने याबाबतचे नियम अधिकच कडक करण्यात आले आहेत. आता प्रत्येकाला मूळ जिल्ह्यातूनच दाखला घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचा फटका गणेशला चांगलाच बसला आहे.
गणेशला पॉलिटेक्निक वा इतर ठिकाणी प्रवेश घ्यायचा झाला तरी त्याला जातीेचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. ते न केल्यास त्याला खुल्या वर्गातून प्रवेश घ्यावा लागेल, त्यासाठी लागणारे शुल्क भरण्याची मोतीराम यांची आर्थिक स्थिती नाही.
पॉलिटेक्निकलाही त्याला आठ हजार रूपये शुल्क भरावे लागणार आहे. वर्षभर पुस्तके, साहित्य आदी इतर बाबींसाठी होणारा खर्च वेगळाच. त्यामुळे आपले इंजिनीअर होण्याचं स्वप्न पूर्ण होईल ना, ही चिंता गणेशच्या भाबड्या चेहऱ्यावर तरळत आहे. (प्रतिनिधी)