.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 13:16 IST2020-04-27T12:55:42+5:302020-04-27T13:16:59+5:30
लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़ मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

.....त्यामुळेच रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त ठरला !
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचे ६ रुग्ण होते़ शनिवारी जिल्हा कोरोनामुक्त झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले़ मात्र, गेल्या १३ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही़ त्यामुळे संपूर्ण यंत्रणेने सुटकेचा श्वास घेतला आहे़ तरीही जिल्ह्याचे आरोग्य कोरोनामुक्त कसे राहील, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा या सर्वांसाठीच पुढील दिवस कसोटीचे ठरणार आहेत़
१८ मार्च रोजी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता़ त्यानंतर काही दिवसातच खेड तालुक्यातील अलसुरे, रत्नागिरीतील राजीवडा-शिवखोल मोहल्ला येथे प्रत्येकी एक आणि साखरतर येथे ३ असे एकूण ६ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते़ खेडमधील रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ या कालावधीतच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले ५३७ संशयित होते़ मात्र, ६ कोरोनाग्रस्तांव्यतिरिक्त ते निगेटिव्ह असल्याचा अहवाल जिल्हा आरोग्य यंत्रणेला प्राप्त झाला होता़
लॉकडाऊनची अंमलबजावणी जनतेकडून करण्यात येत आहे़ लॉकडाऊनकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरही पोलीस यंत्रणेकडून कारवाईचा बडगा उचलण्यात येत आहे़ मात्र, शासनाला सहकार्य करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.
तिन्ही यंत्रणा एकत्र
जिल्ह्यातील तिन्ही यंत्रणा हातात हात घालून काम करीत असल्याने या महामारीच्या दिवसांमध्ये त्याचा मोठा फायदा जिल्हावासियांना झाला आहे़ जिल्हा शासकीय रुग्णालयात तर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ अशोक बोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहेत़
साऱ्यांचेच परिश्रम
जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणेने जिल्हा कोरोनामुक्त होण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली़ जिल्हा रूग्णालयातील इतर विभाग अन्यत्र हलवून हे रूग्णालय केवळ कोरोना रूग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे लोकांसाठी देवदूत ठरले आहेत़ त्यामुळेच जिल्हा कोरोनामुक्त ठरला आहे़