खरं तर शिक्षकांची सेवा धंदा नसून राष्ट्रकार्य आहे़ तसेच शैक्षणिक व्यवस्था ही ज्या समाजाचा भाग असते, त्यापासून अलग राहून आपण कार्य करू शकत नाही, याचे भान ठेवून शिक्षकांनी गेली दोन वर्षे कोरोनाकाळात आपले योगदान दिले, आजही देत आहेत, पुढेही देणार यात शंका नाही. बऱ्याचदा राष्ट्रीय कर्तव्य बजावताना शिक्षकांच्या पदरी अनेक समस्या येत असतात; पण त्याचे भांडवल त्यांनी कधीच केले नाही. मग निवडणूक कामात होणारी परवड असो अथवा स्वतःचे अध्यापन कार्य सांभाळत आलेल्या अन्य कामांचा निपटारा करताना होणारी दमछाक असो. अनेक प्रकारची माहिती, सर्वेक्षण - पटनोंदणी, ऑनलाइन कामे, शालेय रेकॉर्ड, विविध अभियाने, त्यांचे अहवाल, छायाचित्रण अशा असंख्य कामांत शिक्षकांनी का कू केलेले नाही. विशेषतः जिल्हा परिषद शाळांत सात वर्ग चार शिक्षक, चार वर्ग - दोन शिक्षक अशी परिस्थिती असतानाही इमानेइतबारे सेवा बजावणारे शिक्षक ऐनवेळी आलेल्या कामांना तितकाच न्याय देतात. पटसंख्या कमी असली तरी प्रत्येक मुलाला शाळेत दिल्या जाणाऱ्या अनुभवात सहभागी करावेच लागते. त्यातही विविध बौद्धिक स्तराच्या मुलांना त्या त्या प्रकारचे अनुभव देतानाही अधिक परिश्रम घ्यावेच लागतात. तसे पाहिल्यास शिकण्याची प्रक्रिया शाळेत आणि शाळेबाहेरही सुरू असते, हे जरी सत्य असले तरी जेव्हा ही दोन्ही क्षेत्रे परस्परसंवादी असतात तेव्हाच शिकणे अधिक समृद्ध बनते, हे नाकारता येत नाही.
शिकण्यात गुंतलेल्या मुलांना ब्रेक लावला तो जगभरात आलेल्या कोरोनाच्या संकटाने. या संकटात पदाधिकारी - अधिकारी, तज्ज्ञ व्यक्ती यांच्या सल्ल्याने प्रामुख्याने डॉक्टर, परिचारिका, पोलीस, आरोग्यसेवक, आशा वर्कर्स, अंगणवाडीताई आपला जीव धोक्यात घालून काम करीत असताना शिक्षकांनीही आपल्या पदव्यांची आयुधे बाजूला ठेवून रस्त्यावर उतरून काम केले. पोलीसमित्र, रास्त भावाचे धान्य (रेशन) दुकान, क्वारंटाइन सेंटर्स, गावागावात क्वारंटाइन करताना पुढाकार, कॉन्टॅक्ट स्ट्रेसर, झिरो डेथ मिशन, डाटा एन्ट्री ऑपेरेटर, लसीकरण केंद्रावर रजिस्ट्रेशन, घरोघरी जाऊन सर्वेक्षण जबाबदारी अशा अनेक कामांत शिक्षकांनी आपले योगदान दिले. पडेल ते काम केले. कारण एकच देशावर आलेली आपत्ती रोखण्यात आपलादेखील खारीचा वाटा असावा. अनेक सामाजिक आपत्तींना तोंड देताना अनादी काळापासून शिक्षकांनी हातभार दिलाच आहे, कारण हे राष्ट्र माझे आहे, मी त्याच्या भाग्यविधात्याचे एक सामान्य अंग आहे, हे सामाजिक आणि संस्कारिक भान त्याने आजतागायत जपले आहे.
बरं, अशा कामी हातभार लावताना त्यांनी शाळेवर कधीच तुळशीपत्र ठेवली नाहीत. उलट कोरोनाच्या महाभयंकर आपत्तीतही आपल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या हेतूने अनेक तंत्र शिक्षकांनी विकसित केली. शाळा बंद - शिक्षण सुरू ठेवले. ऑनलाइन - ऑफलाइन यांचा सुरेख संगम साधत होणाऱ्या नुकसानीस प्रतिबंध केला. वाड्या-वस्त्यांवरील मुलांना स्वखर्चाने साहित्य पुरविले. अधिकाधिक कालावधी प्रत्यक्ष अध्यापन करण्यासाठीचे नियोजन संबंधित शाळा व्यवस्थापन समिती आणि पालक, गावकरी यांची परवानगी आणि पाठबळ यांचे जोरावर केले. शालेय पोषण आहार उतरवून घेणे, त्याचे वाटप करणे, स्वतःची प्रशिक्षणे, शालेय कामकाजातील यूडायस आराखडा, शाळासिद्धी प्रपत्र, वार्षिक तपासणी, आर्थिक अभिलेखे पूर्तता, नवीन प्रवेश कुटुंब सर्वेक्षण, ऑडिट संबंधाने पूर्तता, शाळा स्वच्छता, कोरोनाकाळातील सुरक्षा जनजागृती, ऑनलाइन सहशालेय उपक्रम पूर्तता, आकारिक मूल्यमापन तयारी, शैक्षणिक वर्ष निकाल पूर्तता आदी अनेक तत्सम कामे त्यांना करावीच लागतात. काय आणि किती ? ते जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. इतके असूनही वेतन वेळेत नाही तरी तक्रार नाही, दुसरा डोस कालावधी उलटूनही तक्रार नाही. सुटी जाहीर होऊनही ड्युटी सुरू पण तक्रार नाही. कोणी काही म्हणो अथवा टीका करोत तक्रार नाही. समाजातील हा संस्कारित घटक आजही चार भिंतींच्या आत वेळोवेळीचे बदल स्वीकारून राष्ट्र जडणघडणीचे काम येईल त्या परिस्थितीला तोंड देत करीत आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही.
- सुहास वाडेकर, हर्चे, लांजा