हम होंगे कामयाब... मन में है विश्वास. . !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:38+5:302021-05-25T04:35:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : ‘हम होंगे कामयाब... मन में है विश्वास.. पुरा है विश्वास..!’ असा आत्मविश्वासपूर्ण आवाज रायपाटणच्या ...

हम होंगे कामयाब... मन में है विश्वास. . !
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : ‘हम होंगे कामयाब... मन में है विश्वास.. पुरा है विश्वास..!’ असा आत्मविश्वासपूर्ण आवाज रायपाटणच्या कोविड केअर सेंटरमध्ये घुमला. रुग्ण, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या या एकत्रित आवाजाने उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांत निश्चितच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असणार. निमित्त होते रत्नागिरीचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा पेवेकर यांच्या समुपदेशनाचे.
रुग्णसेवा ही ईश्वरसेवा मानणारे काही डॉक्टर्स देव म्हणून जनतेनेच स्वीकारलेले असतात. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पेवेकर यांच्या बाबतीतील असाच अनुभव रायपाटण कोविड केअर सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांनी अनुभवला. या रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वेच्छेने डॉ. पेवेकर रत्नागिरीतून तेथे पोहोचले होते.
रायपाटण येथील कोविड केअर सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या मानसिक समस्या जाणून घेऊन त्यांना भेडसावणाऱ्या ताणतणावाचे नियोजन कसे करावे, सकारात्मकता कशी वाढवावी, याबद्दल डॉ. पेवेकर यांनी दीर्घकाळ समुपदेशन केले.
तणावमुक्ती कशी साधावी यांचे विश्लेषणही डाॅ. पेवेकर यांनी केले.
बऱ्याचदा आपण नकारात्मक विचार करीत असतो. त्याचा तसाच परिणाम आपल्या दृष्टिकोनातून व शारीरिक किंवा मानसिक व्याधीतून दिसून येतो. म्हणूनच सकारात्मक, सद्सद्विवेक विचार ‘सेल्फ ऑफर्मेशन’ या तंत्राने कसे करायचे हे डॉ. पेवेकर यांनी प्रत्यक्ष दाखविले व सगळ्यांकडून करवून घेतले.
कोविड रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, फ्रंटलाईन वर्कर्स, कोविड पश्चात व्यक्ती यांना मानसिक आधार, समुपदेशन करण्याकरिता रत्नागिरी जिल्ह्यातील मानसिक आरोग्य व्यावसायिक एकत्र येऊन ‘सुकून’ हा प्रकल्प जिल्हाभर राबविणार आहेत. डॉ. कृष्णा पेवेकर यांचे मार्गदर्शन हा सुद्धा याचाच एक भाग होता. या उपक्रमाला तहसीलदार प्रतिभा वराळे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे, रायपाटणचे वैद्यकीय अधिकारी, तलाठी गुरव, मंडल अधिकारी राईन यांचे यासाठी सहकार्य लाभले.
----------------------
रुग्णांना मानसिक आधार
कोविडच्या दुसऱ्या लाटेची गंभीरता व भयानकता आपण सारे जवळून पाहत आहोत. कोरोनाने आता अनेकांचे आप्त, कुटुंबीय, नातेवाइकांचे बळी घेण्याच्या दुःखद घटना घडत आहेत. त्यात प्रत्यक्ष रुग्णांच्या यातना तीव्र आढळतात. एकंदरीत सगळाच दृष्टिकोन नकारात्मक होऊन जातो. त्याचे पडसाद हे प्रतिकार शक्ती, बरी होण्याची प्रक्रिया, आजारापश्चात उद्भवणाऱ्या मानसिक समस्यांमध्ये दिसून येतात. तणाव, चिंता, भीती का उद्भवतात, मेंदू व मेंदूतील रसायनांचा त्यांच्याशी काय संबंध असतो हे डॉ. पेवेकर यांनी समजावून सांगितले.