रत्नागिरी : जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर पाणीटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा होती. मात्र, पुरेसा पाणीसाठा न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यातील ३७ गावांतील ९० वाड्यांतील २१ हजार ७०४ ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या टंचाईग्रस्तांना केवळ १४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हा पाणीपुरवठा दोन ते तीन दिवसांआड होत असल्याने लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.तापमानात प्रचंड वाढ झाल्याने नद्या, नाल्यांसह विहिरी, विंधन विहिरीतील पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी, ग्रामस्थांना टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावातील वाड्यांना ३ खासगी आणि ११ शासकीय टँकरने पाणीपुरवठाही अपुरा असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. अनेक वाड्यांमध्ये विकतचे पाणी पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रत्येक दिवशी टंचाईग्रस्त वाड्यांची भर पडत असल्याने प्रशासनालाही पाणी पुरवठ्याचे नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.
पाच तालुक्यांमध्ये टंचाईचे स्वरुप गंभीरमंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी आणि लांजा हे पाच तालुके सध्या टंचाईग्रस्त म्हणून घोषित आहे. या तालुक्यातील बहुतांश गावे डोंगराळ, दुर्गम असून विहिरींची पाणी पातळी कमी झालेली आहे. अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांमध्ये पाणी आटल्याने जनजीवन विस्कळीत झाली आहेत.
शहरी भागातही समस्या मोठीजिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणची समस्याही मोठी आहे. रत्नागिरीला शीळ धरणाची मोठी साथ असल्याने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्यात येत आहे. मात्र अन्यत्र एक दिवसआड किंवा आठवड्यातून मर्यादित वेळा पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागात अपार्टमेंटची संख्या वाढत असल्याने अनेक ठिकाणी लोकांना टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
बांधकामांसाठीही मोठी मागणीपावसाळा तोंडावर आला असल्याने बांधकामांनाही वेग आला आहे. त्यासाठीही पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात धावणाऱ्या टँकर्सची संख्या वाढली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय टंचाईग्रस्त गावे आणि वाड्या
तालुका | गावे | वाड्या | टँकर |
मंडणगड | १ | १ | १ |
खेड | १० | १५ | १ |
चिपळूण | ९ | १३ | १ |
संगमेश्वर | ६ | १० | २ |
रत्नागिरी | ९ | ४८ | ८ |
लांजा | २ | ३ | १ |