धरणात मुबलक पाणी, रत्नागिरीकर तहानलेले

By Admin | Updated: June 20, 2015 00:36 IST2015-06-19T23:17:15+5:302015-06-20T00:36:21+5:30

रत्नागिरी पालिका : ५३ कोटींच्या जलव्यवस्थापन योजनेनंतर मिळणार नागरिकांना पाण्याचे सुख

Water in the dam, Ratnagiri thirsty | धरणात मुबलक पाणी, रत्नागिरीकर तहानलेले

धरणात मुबलक पाणी, रत्नागिरीकर तहानलेले

रत्नागिरी : विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा गेल्या काही वर्षांपासून विस्कळीत आहे. शीळची मुख्य जलवाहिनी जागोजागी गंजल्याने वारंवार फुटत आहे. अंतर्गत पाणी वितरण वाहिन्याही कालबाह्य झाल्या आहेत. शीळ धरणात पाणी मुबलक असूनही रत्नागिरीकरांपर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नसल्याने अद्याप रत्नागिरीकर तहानलेलेच आहेत. मात्र, आता नगरोत्थान योजनेतून ५३.५३ कोटींचा जलवितरण सुधारणा प्रकल्प येत्या दिवाळीनंतर राबविण्यात येणार आहे. त्यानंतर रत्नागिरीकरांना पाण्याचे सुख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
रत्नागिरी पालिकेची लोकसंख्या ७७ हजारांपेक्षा अधिक असून, जिल्ह्याच्या राजधानीचे ठिकाण असल्याने येथे रोज ये-जा करणाऱ्यांची वर्दळ असते. त्यामुळे लाख ते सव्वा लाख लोकांचा भार हे शहर वाहात आहे. पालिकेच्या सर्व सोयीसुविधा शहरातील नागरिकांबरोबरच शहराबाहेरून येणारेही वापरत आहेत. त्यामुळे शहर व्यवस्थापनावर त्याचा भार नक्कीच आहे. परंतु जलवाहिन्याच कुचकामी झाल्याने शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
सध्याच्या पाणी वितरण व्यवस्थेनुसार शहरातील काही भागात २४ तास पाणी मिळत आहे, तर काही विभागातील लोकांना अर्धा तासही पाणी मिळत नाही. जे मिळते तेही पुरेशा दाबाने नसल्याने अपुरा पाणीपुरवठा होतो. पाणी वितरणाचे प्रमाण शहराच्या विविध भागात असे व्यस्त व गोंधळाचे असून, त्यात सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी त्याबाबत गेल्या चार वर्षांच्या काळात वारंवार पाठपुरावा केला. मात्र, स्थिती जैसे थे राहिली. गेल्या दोन महिन्यांच्या काळात रत्नागिरी पालिकेकडून पाणी समस्या सोडविण्याबाबत गांभीर्याने प्रयत्न सुरू झाले असून, शासनाच्या नगरोत्थान योजनेतून ५३.५३ कोटींचा पाणी वितरण सुधारणा प्रकल्पाचा प्रस्ताव पालिकेने शासनाकडे पाठवला आहे. याबाबतचा प्रस्ताव जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून बनवण्यात आला आहे. या प्रकल्पानुसार शीळ धरण ते साळवी स्टॉप जलशुध्दिकरण केंद्रापर्यंतची १५ इंच व्यासाची गंजलेली जलवाहिनी बदलली जाणार असून, तेथे १८ इंच व्यासाची जलवाहिनी टाकली जाणार आहे. जलवाहिनीचा व्यास वाढवल्याने पाणी पुरवठा अधिक प्रमाणात होईल व जलवाहिनीवर ताणही कमी पडेल, असे अभियंत्यांचे मत आहे.
शहराला पाणी पुरविणाऱ्या हातखंबा येथील पालिकेच्या मालकीच्या पानवल धरणावरून येणारी जुनी कॉँक्रीट कोटिंग असलेली जुनी लोखंडी जलवाहिनीही जागोजागी फुटली असून, नव्या प्रकल्पात ही जलवाहिनीही पानवल धरण ते नाचणे जलशुध्दिकरण प्रकल्पापर्यंत बदलली जाणार आहे. पानवल धरण हे ४८ वर्षांपूर्वीचे असल्याने पूर्णत: खचलेले आहे. त्यामुळे पाटबंधारे खात्यामार्फत या धरणाची नव्याने उभारणी केली जात असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पानवल धरणाची उंची वाढवली जाणार असून, त्यातून जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांच्या काळात रत्नागिरी शहराला प्रतिदिवस १६ दशलक्ष लीटर पाणी विजेचा वापर न करता केवळ गुरुत्वबलाच्या आधारे रत्नागिरीत आणले जाईल. त्याचवेळी शीळमधून ६ दशलक्ष लीटर पाणी उचल केली जाणार आहे. जानेवारी ते जूनपर्यंत शीळ धरणातील १६ दशलक्ष लीटर पाणी शहरासाठी वापरताना पानवलचे केवळ ६ एमएलडी पाणी वापरले जाणार आहे. शहरातील १० हजारांवर असलेल्या नळ जोडण्यांना जलमापक सक्तीने बसविले जाणार आहेत. रत्नागिरीकरांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे, यात शंका नाही. जलमापक यंत्र बसवून जेवढा पाणी वापर आहे, तेवढेच पाणी बिल येईल. सध्या अतिरिक्त पाणी वापरणाऱ्यांना व अत्यल्प पाणी मिळणाऱ्यांनाही सारखेच पाणी बिल आहे. जलमापकामुळे अतिरिक्त पाणी वापरणाऱ्यांना चाप बसेल. मात्र, पाणी वितरणात कठोर व्यवस्थापन आवश्यक आहे. (प्रतिनिधी)


शहरातील शेकडो पथदीपही बंदच
शहरवासीयांच्या पाणी समस्येबरोबरच रत्नागिरीत पालिकेच्या मालकीचे १५००, तर महावितरणच्या मालकीचे २५०० पथदीप आहेत. त्यातील सुमारे ५०० पथदीप गेल्या काही काळापासून बंद आहेत. शहरात एलईडी बसविले जाणार आहेत म्हणून पथदिव्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, एलईडी लागतील तेव्हा लागतील, त्याआधी पथदीप सुरू करावेत व शहरातील अंधार दूर करावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Water in the dam, Ratnagiri thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.