आवरायलाच हवं!

By Admin | Updated: July 23, 2016 00:06 IST2016-07-22T22:37:51+5:302016-07-23T00:06:52+5:30

मग अशी प्रकरणे बलात्कार म्हणून दाखल होतात. ही बाब चिंताजनक नाही?

Want to get on! | आवरायलाच हवं!

आवरायलाच हवं!

बलात्काराच्या, अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडच्या काळात बरीच वाढ झाली आहे. या विषयातले राजकारण बाजूला ठेवून त्यावर विचार करायला हवा, असा मुद्दाच कोणी पुढे आणताना दिसत नाहीत. ज्यात-त्यात राजकारणच (आणि अलिकडे पुन्हा वाढलेला जातीयवाद) आणण्यात अनेकांना रस असतो. शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले-मुली शरीरसंबंध ठेवतात आणि मग अशी प्रकरणे बलात्कार म्हणून दाखल होतात. ही बाब चिंताजनक नाही? वेळीच सावरायला आणि त्याहीपेक्षा आवरायला हवे. संस्कारांची धार कमी पडत चालली आहे का?

१९ वर्षाच्या मुलाने १७ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी वाचताना थरथरायलाच होते. वर्षभर प्रेमप्रकरण सुरू होते. मुलगी तीन महिन्यांची गरोदर असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी संबंधित मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. एक संवेदनशील शिक्षिका सांगत होत्या, आठवी-नववीतल्या मुलींकडे प्रेमपत्र सापडतात. त्यातील भाषाही गचाळ असते. आठवी-नववीपासूनच शारीरिक संबंधांबाबत पूर्ण माहिती असते आणि काहीजण अनुभवही घेतात. त्या शिक्षिकेने असंख्य मुलींचे समुपदेशन करून त्यांना अशा गोष्टी करण्याचे वय अजून यायचं असल्याची जाणीव करून दिली.
ही बाब धक्कादायक नाही? यात कुठल्या राजकीय पक्षाचा दोष नाही. यात पोलीस यंत्रणेचा दोष नाही. चोऱ्या, दरोडे, मारामाऱ्या, खून यात वाढ झाली तर पोलीस यंत्रणेला दोष देता येईल. पण शाळकरी मुलांमध्ये असे प्रकार घडतात, याचा दोष पोलीस यंत्रणेचा कसा काय असेल? हा दोष समाजाचाच आहे. अशा गोष्टी रोखायला समाज व्यवस्थाच कारणीभूत आहे. पालकांचा मुलांशी कमी होणारा संवाद हेही त्याचे प्रमुख कारण आहे. ज्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई-वडील दोघेही नोकरी करतात, त्या मुलांच्या वर्तनाकडे, त्या मुलांच्या बदलत्या मानसिकतेकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच नाही.
खेड तालुक्यात १५ दिवसात शाळकरी मुलांशी संबंधित काही घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे आपण कुठे चाललोय हेच समजत नाही. काही प्रकार खरोखरच निंदनीय आहेत. विद्यार्थिनींशी लिपिकाचे किंवा शिक्षकाचे गैरवर्तन ही बाब गैरच आहे. अशा प्रवृत्ती वेळीच शोधून ठेचूनच काढायला हव्यात. पण शाळकरी मुला-मुलींचे प्रेमप्रकरण आणि शारीरिक संबंध या गोष्टी मात्र धक्कादायक आहेत.अशी परिस्थिती निर्माण व्हायला कुठला एकच विशिष्ट घटक कारणीभूत आहे, असे नाही. अनेक गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्या साऱ्या एकत्रित होऊनच समाज व्यवस्था बनते. थोडक्यात ही व्यवस्थाच अस्थिर झाली आहे. चंगळवादी झाली आहे. भविष्याचा विचार करताना फक्त भविष्यकाळासाठीच्या आर्थिक तरतुदीचा विचार केला जातो. संस्कार हा भाग त्यात दुर्लक्षिलाच गेला आहे. माझा मुलगा संस्कारक्षम माणूस व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याऐवजी माझ्या मुलाला डॉक्टर करायचंय, परदेशात पाठवायचंय म्हणून आर्थिक तरतूद केली जाते. पालक आणि मुलांमधले कमी होणारे संवाद हा त्यातील एक प्रभावी घटक आहे.एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर चर्चा सुरू होती. पालक काय आपल्या मुलाला बलात्कार करायला शिकवतात काय, असा मुद्दा एकाने हिरीरीने मांडला. पालक मुलांना बलात्कार करायला शिकवत नाहीत, हे खरं आहे. पण मुलीकडे माणूस म्हणून बघ, तिच्याकडे वस्तू म्हणून बघू नको, हा संस्कार पालकांनीच द्यायचा आहे ना? मुलीने नीट कपडे घालावेत, असे सांगणारे लोक मुलांची नजर सुधारावी, असा मुद्दा का मांडत नाहीत? म्हणजेच मुलांच्या मनातली मुलीची, स्त्रीची प्रतिमा आदराची असावी, यासाठी संस्कारचं हवेत ना? त्यासाठी संवाद हवा.ही सर्व परिस्थिती वेळीच सावरायची असेल तर मुलांच्या मानसिकतेला आवरावं लागेल. त्यासाठी पालकांनी सजग आणि सतर्क व्हावे लागेल. पालकांनी मुलांवर सुसंस्कार करावेत यासाठीचा कायदा नाही. पालकांनी मुलाच्या भवितव्यासाठी पैसा जोडण्याबरोबरच संस्कारही जोडणे गरजेचे बनले आहे. संस्कारांची अधिक गरज मुलींपेक्षा मुलांनाच अधिक आहे. पुढचा समाज सुदृढ होण्यासाठी आताच्या मुलांवर सुसंस्कार होणे आवश्यक आहे. आधीच या पिढीसमोरची प्रलोभने खूप आहेत. त्यात त्यांना आवश्यक संस्कार मिळाले नाहीत तर...?

मनोज मुळ्ये

Web Title: Want to get on!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.