Local Body Election: रत्नागिरीत एका प्रभागातील दाेन जागांसाठी आज मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 13:29 IST2025-12-20T13:27:48+5:302025-12-20T13:29:58+5:30
भाजप-उद्धवसेना यांच्यात लढत

संग्रहित छाया
रत्नागिरी : उमेदवार अपात्रतेच्या मुद्यांवरून स्थगित करण्यात आलेली रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक १० च्या निवडणुकीसाठी शनिवार दि. २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. अ आणि ब प्रभागातील एकूण ४,१४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. २१ रोजी निवडणुकांसाठी मतदान झालेल्या जिल्ह्यातील ७ नगर परिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे साऱ्यांचेच आता या निकालाकडे लक्ष लागून राहिले आहे.
रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक १० अ आणि ब मधील मनसेच्या उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आल्याने या उमेदवारांनी रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्याकडे दावा दाखल केला. मात्र, त्यांची उमेदवारी अवैध ठरविण्यात आली. त्यामुळे या उमेदवारांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला. त्याचा निर्णय अद्याप लागलेला नाही. राज्यातील २० नगर परिषदा, नगर पंचायतींच्या बाबतीत असे प्रकार घडल्याने राज्य निवडणूक आयोगाने या नगर परिषदांबरोबरच रत्नागिरीतील प्रभाग क्रमांक १० ची मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी स्थगित केली होती.
आता ही मतदान प्रक्रिया शनिवार, दि. २० डिसेंबर रोजी या प्रभागातील ४ मतदान केंद्रांवर होणार आहे. एकूण ४,१४४ नागरिक मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २,०७९ पुरुष आणि २,०६५ महिला मतदारांचा समावेश आहे. या प्रभागातील अ मध्ये भाजपच्या मानसी करमरकर आणि उद्धव सेनेच्या श्वेता कोरगावकर यांच्यात लढत आहे. ‘ब’ मध्ये भाजपचे राजेश तोडणकर आणि उद्धव सेनेचे राजाराम रहाटे यांच्यात लढत होणार आहे.
मात्र, या प्रभागाची मतदान प्रक्रिया लांबणीवर पडल्याने या चारही उमेदवारांना प्रचार करण्यासाठी अधिक दिवस मिळाले आहेत. त्यामुळे या मतदानात कोण बाजी मारणार हे २१ रोजीच्या निकालावेळी स्पष्ट होईल.