अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी गाव सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 13:05 IST2021-02-03T13:03:31+5:302021-02-03T13:05:59+5:30
accident Ratnagiri- गाव करील ते राव न करील ही म्हण सार्थ ठरवत हातखंबा आणि झरेवाडी येथील ग्रामस्थ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.

अपघातग्रस्त महिलेच्या मदतीसाठी गाव सरसावले
हातखंबा : गाव करील ते राव न करील ही म्हण सार्थ ठरवत हातखंबा आणि झरेवाडी येथील ग्रामस्थ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा गावामध्ये दि. २७ रोजी एका मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झरेवाडी येथील मोटारसायकलस्वार राजेश धुमक या तरूणाचा जागीच मृत्यु झाला होता. त्याचा मुलगा साहिश (६) याला व त्याची आई ऋतुजा धुमक हे दोघेजण गंभीर जखमी झाले. या दोघांना अधिक उपचाराकरिता कोल्हापूर येथे नेत असताना वाटेतच साहिश याचा मृत्यू झाला.
ऋतुजा धुमक या गंभीर जखमी झाल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातग्रस्त दाम्पत्याच्या घरी वृध्द आई-वडील आहेत. त्यांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ऋतुजा यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे हातखंबा व झरेवाडी येथील अनेकांनी घरोघरी जाऊन निधी गोळा केला आहे. धुमक कुटुंबाच्या मदतीसाठी सर्वजण फिरत आहेत.